मुंबई, नवी मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे टोलच्या मुद्दयावरून प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी टोल हा मोठा स्कॅम आहे. टोल दरवाढ मागे न घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा दिला होता. तसेच लहान वाहनांना टोल लागू नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आता टोल नाक्यांवर उभे राहतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी हा इशारा देताच मनसे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले. मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यांवर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल टोलनाक्यासह मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर मनसे पदाधिकारी पोहोचले. यावेळी त्यांनी येणाऱ्या प्रत्येक छोट्या वाहनांना सोडण्यास सुरुवात केली. टोलनाक्यांवरील काही कर्मचाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या विधानाचा व्हिडीओच दाखवला. छोट्या वाहनांना आम्ही कधीच टोल माफ केला आहे, असं फडणवीस या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ दाखवून त्यांनी छोट्या वाहन असलेल्यांना विना टोल सोडण्यास सुरुवात केली.
मनसेने हे आंदोलन करताच मुलुंड टोलनाक्यावर पोलिसांनी येऊन मनसे कार्यकर्त्यांना अटकाव केला. यावेळी काही मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आम्ही आंदोलन केलं नाही. आम्ही जनजागृती करत आहोत. जनजागृती करण्याचा आम्हाला अधिकार आहे. हवं तर आम्हाला उचलून न्या. माझी अटक कायद्यात बसत नाही. पोलिसांनी मला नोटीस द्यावी आणि मगच अटक करावी, असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.
तसेच या वाहनचालकांनाही मनसे पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांचा व्हिडीओ दाखवला. आता रोज या टोलनाक्यावरून जाताना पैसे भरू नका. पैसे न भरताच जा. तुम्हाला टोल माफ करण्यात आला आहे, असं हे पदाधिकारी वाहनचालकांना सांगत होते. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे टोलनाके मनसेच्या घोषणाबाजीने दणाणून गेले होते.
मनसे नेते अविनाश जाधव हे मुलुंड चेकनाक्यावर आले होते. यावेळी ते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ दाखवत होते. तुम्हाला टोल माफ केल्याचं फडणवीस यांनीच सांगितल्याचं ते वाहनचालकांना सांगत होते. मी टोलनाक्यावर आलोय. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही टोलनाक्यावर आलोय. लोक म्हणतात आम्ही फडणवीस यांचा व्हिडीओ पाहिला आहे. आम्ही टोल भरणार नाही. फडणवीस यांनीच त्याबाबत सांगितलं आहे. आम्ही सांगितल्यानंतर लोक टोल भरत नाहीये, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
आम्ही टोल नाक्यावरील स्क्रीनवर देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ दाखवणार आहोत. लोकांना टोल भरू नये म्हणून आवाहन करणार आहोत, असं अविनाश जाधव यांनी सांगितले. मनसेचे नेते योगेश चिले हे पनवेल टोलनाक्यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत आले होते. त्यांनीही टोल न भरता वाहने सोडण्यास सुरुवात केली.
फडणवीस यांनी काल सांगितल्यानंतर रात्री टोल बंद करायला हवा होता. त्यांनी टोल बंद केला नाही म्हणून आम्ही टोलनाक्यावर आलो. आज आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. तीन दिवसानंतर शांततेत आंदोलन होणार नाही, असा इशाराच योगेश चिले यांनी दिला आहे. तसेच आतापर्यंत टोलच्या नावावर जो पैसा खाण्यात आला. तो पैसा गेला कुठे? असा सवालही त्यांनी केला.