मुंबई : “आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक पद्धतीने आंदोलन करु. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल”, असा इशारा मनेसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्राद्वारे दिला आहे. मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस केतन नाईक यांनी ट्विटवरवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर पत्राचा फोटोदेखील शेअर केला आहे (MNS warn to Disney Hotstar).
“आयपीएल क्रिकेट सामान्यांचं समालोचन मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करु, पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या”, असादेखील इशारा मनसेचे केतन नाईक यांनी दिला (MNS warn to Disney Hotstar).
“डिस्ने हॉटस्टार या ओ.टी.टी. व्यासपीठावर आयपीएलचे टी-20 सामने दाखविण्यात येत आहेत. हे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना खेळाचे समालोचन त्यांच्या पसंतीच्या भाषेत ऐकण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कनडा आणि बंगाली भाषा निवडण्याचा पर्याय आहे. पण महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही”, असं मनेसेने पत्रात म्हटलं आहे.
“डिस्ने हॉटस्टारचं मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आहे. विशेष म्हणजे आयपीएलचे टी-20 सामने पाहणारा मराठी भाषिक प्रेक्षकवर्ग जास्त असताना आपल्याला मराठी भाषेचा विसर पडला. मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला गेला”, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
आय.पी.एल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या..@DisneyPlusHS @IPL pic.twitter.com/edXTO2TONY
— Ketan Naik (@ketannaik4) October 20, 2020
मनसेकडून याआधी ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅमेझॉन कंपनीला पत्र पाठवण्यात आलं होतं. अॅमेझॉनमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, अशी मागणी मनसेने पत्राद्वारे केली होती. ही मागणी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी मान्य केली आहे. डिजिटल सेवेत मराठीच्या समावेशासाठी अॅमेझॉनचे शिष्टमंडळ मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. अॅमेझॉननंतर मनसेने डिस्ने हॉटस्टारकडे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी पत्र पाठवलं आहे.
हेही वाचा :
मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली