मुंबई | 6 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षात जोरदार हालचाली घडत आहेत. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे पक्ष जोरदार कामाला लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय राज ठाकरे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जावून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज ठाकरे यांचं पुणे लोकसभा मतदारसंघाकडेदेखील विशेष लक्ष आहे. राज ठाकरे गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने पुण्याचा दौरा करत आहेत. याशिवाय पुणे लोकसभेच्या जागेसाठी पुण्यातील मनसेचे स्थानिक नेते देखील इच्छुक आहेत. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना आता मनसेची लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
मनसे संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी Tv9 मराठीच्या हाती लागली आहे. लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यापासून वसंत मोरे यांची नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजू पाटील, कल्याण
अभिजीत पानसे, ठाणे
बाळा नांदगावकर, दक्षिण मुंबई
नितीन सरदेसाई, दक्षिण मध्य मुंबई
संदीप देशपांडे, ईशान्य मुंबई
संजय तुर्डे, उत्तर मध्य मुंबई
गजानन राणे, उत्तर मुंबई
वागीश सारस्वत, उत्तर पश्चिम मुंबई
सुधीर पाटस्कर, बारामती
वसंत मोरे, पुणे
वैभव खेडेकर, रायगड
दिलीप धात्रे, सोलापूर
राजू उंबरकर, चंद्रपूर
डॉ. प्रदीप पवार, नाशिक
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे यांना कदाचित आगामी काळात राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची मते आगामी लोकसभा निवडणुकीत विभागली जाण्याची चिन्हं आहेत. या परिस्थितीत राज ठाकरे कुणासोबत युती करणार? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.