मुंबई : मनसेनं हनुमान चालिसा रथ यात्रेचं आयोजनं केलं होतं. पण, राज्य सरकारनं कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही रथ यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळं माहीम विधानसभा क्षेत्राचे मनसेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी नाराजी व्यक्त केली. आता यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी नवी मागणी केली. यामुळं शिवसेना अडचणीत येऊ शकते. या नवीन मागणीनुसानर, शिवसेना भवनात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि आरती करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) केली आहे. आधी मनसेनं राज्य सरकारला हनुमान चालिसा रथ यात्रा काढू देण्याची परवानगी मागितली होती. पण, राज्य सरकारनं ती परवानगी नाकारली. त्यामुळं मनसेनं शिवसेना भवनात हनुमान चालिका करू द्या, आरती करू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानुसार, शिवसेना भवन हे सर्वांसाठी मंदिर आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं शिवसेना भवन हे सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. शनिवारी, 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती सेना भवनातील मातेच्या मंदिरात हनुमान चालिसा आणि आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
यशवंत किल्लेदार यांनी रामनवमीनिमित्त हनुमान चालिसा रथ यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेचा प्रारंभ शिवसेना भवन येथून होणार होता. पण, राज्य सरकारनं ही यात्रा रद्द केली. त्यामुळं नाराज झालेल्या किल्लेदार यांनी आता दुसरी मागणी केली आहे. हिंदुत्वासाठी महाआघाडी सरकार एकत्र आलं. मग, हनुमान चालिसा वाजविल्यास कारवाई का करावीशी वाटली, तुम्ही हिंदूत्व सोडले का, हनुमान चालिसासाठी द्वेष का, असे प्रश्न पत्राच्या माध्यमातून किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
किल्लेदार म्हणतात, आमचा कुठल्याही धर्माला, प्रार्थनेला विरोध नाही. आमचा एकतर्फी कारवाईला विरोध आहे. आम्ही रमजानला मुस्लिम बांधवांच्या घरी जातो. गणेशोत्सवात ते आमच्याकडं येतात. पण, रथ यात्रेला विरोध करणारी कारवाई योग्य नाही. त्यामुळं आता शिवसेना भवनातच आरतीला परवानगी द्या, असं किल्लेदार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री या पत्राला काय उत्तर देतात हे पहावं लागेल.