मागील वर्षी मान्सूनने सरासरी गाठली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु यंदा हवामान विभागाने दिलासा देणारी बातमी एप्रिल महिन्यातच दिली होती. महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानंतर अंदमान निकोबारमध्ये वेळेपूर्वीच मान्सून आला. पुढे त्याची वाटचाल दमदार सुरु राहिल्याने केरळमध्ये एक जून ऐवजी 30 मे रोजीच मान्सून आला. त्यानंतर गोवा आणि कोकणात मान्सून वेळेआधीच दाखल झाला. आता मुंबईत दोन दिवस आधीच मान्सून पोहचला आहे. 11 जून रोजी येणारा मान्सून 9 जून रोजी मुंबईत आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईत मान्सून आल्याची माहिती मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आता पुढील 48 तासांत मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 9 ते 11 जून दरम्यान मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. रविवारी मुंबईतील अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे.
मुंबईत रविवारी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच मुंबईत आज हायटाईडचा इशारा दिला आहे. मुंबईतील समुद्रात आज दुपारी 2.17 मिनिटांनी 4.45 मीटरच्या हायटाईड निर्माण होणार आहे. उद्या रात्री 1.55 hrs वाजता 3.74 मीटरच्या लाटा उसळणार आहे.
राज्यात मान्सूनच आगमन दोन दिवसांपूर्वी कोकणात झाले आहे. त्यानंतर राज्यातील इतर भागात मान्सून दाखल होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारच्या सुमारास अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात देखील पुढील 3 दिवसात जोरदार पाऊस असणार आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात करायला हरकत नाही, पण पेरणीसाठी घाई करू नका, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात या वर्षीची विक्रमी 121 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस 187 मिलिमीटर कुडाळ तालुक्यात झालाय तर देवगडमध्ये 158 मिलिमीटर मालवणमध्ये 152 मिलिमीटर सावंतवाडीमध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने पहाटेपासून विश्रांती घेतली असली तरी पुढच्या 24 तासांत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.