Mumbai Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमध्ये हाहा:कार, होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 64 जण जखमी, 50 जण अजूनही अडकल्याची भीती

| Updated on: May 13, 2024 | 9:15 PM

घाटकोपरमध्ये अतिशय मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक आलेला वादळी वारा आणि पावसामुळे पेट्रोल पंपावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं आहे. त्यामुळे मोठा हाहा:कार उडाला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 61 जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. तर 50 जण अजूनही अडकल्याचा अंदाज आहे.

Mumbai Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमध्ये हाहा:कार, होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 64 जण जखमी, 50 जण अजूनही अडकल्याची भीती
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने हाहा:कार
Follow us on

मुंबईत अचानक आलेला अवकाळी पाऊस हा भलंमोठं संकट घेऊन आला. पावसासोबत मेघगर्जना आणि जोरदार वारे वाहत होते. यामुळे घाटकोपरच्या छेडानगर परिसरात मोठी दुर्घटना घडली. या भागात एका मोठ्या पेट्रोल पंपाच्या बाजूला भलंमोठं होर्डिंग लावण्यात आलं होतं. वाऱ्यामुळे हे होर्डिंग थेट पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं. त्यामुळे संपूर्ण पेट्रोल पंप जमीनदोस्त झालं. विशेष म्हणजे या पेट्रोल पंपावर जवळपास 100 पेक्षा जास्त जण होते. पाऊस सुरु असल्यामुळे अनेक जणांनी पेट्रोल पंपावर काही वेळ थांबणं पसंत केलं होतं. तर दुसरीकडे अनेक वाहनं पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. पेट्रोल पंपावर गर्दी होती. असं असताना अचानक होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. अतिशय युद्ध पातळीवर बचाव पथकाचं बचावकार्य सुरु आहे.

घाटकोपरच्या छेडा परिसरात ही घटना घडली. संबंधित घटना ही आज संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आतापर्यंत 61 जण या घटनेत जखमी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. सर्व जखमींना जवळील राजापूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही 50 नागरीक पेट्रोल पंपावर खाली अडकल्याचा अंदाज आहे. तसेच 10 ते 12 मोठ्या गाड्या या अडकल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेकडून बचाव कार्य सुरु होतं. पण आता एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं आहे.

बचाव पथकासमोर अनेक आव्हानं

पेट्रोल पंप मोठा होता. या पेट्रोल पंपवर जाहिरातीचं होर्डिंग पडल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोखंडी आणि सळई आहेत. याशिवाय पेट्रोल पंप असल्यामुळे या लोखंड आणि सळईला कापण्यासाठी गॅस लाईनचा वापर करता येणार नाही. त्यामुळे बचाव पथकाला मोठी कसरत करुन बचाव कार्य करावं लागणार आहे.

घटनास्थळी मोठमोठ्या क्रेन

आतापर्यंत 54 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त पालिकेच्या बचाव कार्य रुममधून लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळी अनेक बडे नेते येऊन गेले आहेत. बचाव कार्य सुरु आहे. मुंबई महापालिकेकडून मोठमोठ्या क्रेन घटनास्थळी आणण्यात आल्या आहेत. तसेच जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी जवळपास 18 ते 20 रुग्णवाहिका आणण्यात आल्या आहेत.