संदीप राजगोळकर, नवी दिल्ली, दि. 5 फेब्रुवारी 2024 | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा हल्ला केला आहे. मनी लॅन्ड्रींग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा केला. देशात या पद्धतीने आतापर्यंत विरोधकांना ईडीने अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारीचा पैसा स्विकारला आहे. यासंदर्भात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे स्टेटमेंट आहे. गणपत गायकवाड म्हणतात, माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. गणपत गायकवाड यांच्या आरोपानुसार आता त्याचा शोध घेतला पाहिजे. आमच्या माहितीनुसार, हा पैसा शंभर कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात अटक करता येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मनी लॅन्ड्रींग कायद्यानुसार या गुन्ह्यात पुरावा लागत नाही. या प्रकरणात स्टेटमेंट आले आहे. हे स्टेटमेंट हाच पुरावा असतो. त्यामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितल्यानुसार आता किरीट्ट सोमय्या यांनी या प्रकरणात करवाईची मागणी करायला हवी. या कायद्याचा गैरवापर होत आहे. आता या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केली तर ईडीची भूमिका भ्रष्टचारविरोधी असल्याची स्पष्ट होईल.
बाळराजांचा वाढदिवस राज्यभर साजरा झाला. ते हाडवैद्य आहे. त्या हाडवैद्यांना आम्ही खासदार केले. त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. त्यांना आमच्याही शुभेच्छा आहेत. परंतु बाळराजे यांच्या खास माणसांवर भाजप आमदार गोळीबार करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज होती. त्यासंदर्भातील एक फोटो मी ट्विट केला आहे. यासंदर्भात अनेक गुंडाचे फोटो आहे. हे गुंड कोण आहेत, त्याची पोलिसांनी चौकशी करावी.
मा. गृहमंत्री देवेन्द्रजी
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!
गुंडांचे इतके बळ का वाढले?
या परिस्थितीस जबाबदार कोण?
काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील… pic.twitter.com/jnmgurI5gm— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2024
गुंडाचे संघटन बनवण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी दिली गेली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायद्याची चाढ असेल तर ते कायद्याने काम करतील. ते एकनाथ शिंदे यांच्या दहशतीखाली आहे का? हे त्यांनी सांगावे.
शिंदे गटाचे खासदार परदेशात गेले होते. त्यांचा व्हिडिओ मला मिळाला आहे. तो व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. शिंदे गँगचे खरे चरित्र काय आहे, हे समोर येईल. त्यासाठी वेट अँड वॉच करा.
अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार इतके निर्दयी होतील, असे मला वाटले नाही. ज्या पवार साहेबांनी आपणास खाऊ, पिऊ घातले. त्यांना ओळख दिली. त्यांना धडे दिले. त्यांच्याबाबत इतके कृतघ्न असू नये. अजित पवार यांनी नवीन भूमिका घेतल्यापासून ते लांडग्यांच्या भूमिकेत गेले आहे.