Maharashtra Political Crisis | सुप्रिया सुळे अ‍ॅक्शन मोडमध्ये, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द होणार?

| Updated on: Jul 03, 2023 | 5:33 PM

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. त्यामुळे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची खासदारकी आगामी काळात खरंच रद्द होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Political Crisis | सुप्रिया सुळे अ‍ॅक्शन मोडमध्ये, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द होणार?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन भाजप आणि शिवसेना सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या इतर 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्यासह जे नेते सरकारमध्ये सामील झाले आहेत ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्याच्याशी पक्षाचा काहीच संबंध नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

शरद पवार स्वत: आता राजकीय मैदानात उतरले आहेत. ते आता पक्षाला वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार, खासदार परत येतील, असा दावा शरद पवार यांनी केलाय. तसेच त्यांनी केलेला दावा काही अंशी खरंदेखील ठरताना दिसतोय. काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत किती आमदार राहतील, याबाबतचं चित्र पुढच्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे, पण ते बंड पुन्हा फसणार नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतंय.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याकडे नेमकी काय विनंती केली?

“सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 ला पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडलंय आणि अपात्र ठरवले आहेत. माझी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती आहे की, याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी. संसद सदस्य प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकरणासमोर पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल दाखल करावी”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.