यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली. राज्यातील प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रूपये खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेची जोरदार चर्चा असून महिलावर्गाकडून सरकारचं कौतुक होताना दिसत आहे. या योजनेचे महिलांना येत्या रक्षाबंधनापासून पैसे मिळणार आहेत. या योजनेवरून विरोधकांनी तरूणांसाठी काहीच का केलं नाही? असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरूवात केली होती. मात्र अशातच राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची घोषणा केली असून यासाठी वयाची अट काय असणार जाणून घ्या.
लाडका भाऊ योजनेसाठी राज्य सरकाराने उमेदवारांसाठी काही पात्रता निश्चित केल्या आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पात्रतेबाबत मोठा निकष आहे. जर तुम्ही त्यामध्ये बसत नसाल तर महायुती सरकारच्या लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. त्यामुळे याबाबतची सर्व काही माहिती जाणून घ्या. राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला 6 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 36 असलं पाहिजे. त्यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आधार नोंदणी असायला हवी. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्मदाखला किंवा वयाचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक ही कागदपत्रे लागणार आहेत.