Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची दुसरी बाजू समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या योजनेत अपात्र असलेल्या पाच लाख महिलांनाही योजनेचा निधी देण्यात आला होता. नवीन फडणवीस सरकार आल्यावर या योजनेत अपात्र असलेल्या महिलांची छननी करण्यात आली. त्यानंतर लाभार्थींची संख्या पाच लाखांनी कमी होऊन 2.41 कोटींवर आली आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 2.46 कोटी होती. या पाच लाख अपात्र महिलांना 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ही रक्कम परत घेतली जाणार नाही. त्यामुळे 450 कोटी रुपयांचा फटका सरकारला बसला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली. योजनेसाठी एकूण 2.46 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते देण्यात आले. त्यानंतर जानेवारीपासून अर्जांची छननी सुरु झाली. त्यात पाच लाख महिला अपात्र ठरल्या. या महिलांनाही जुलै ते डिसेंबर असे सहा महिन्यांचे हप्ते देण्यात आले आहे. त्याची रक्कम 450 कोटी रुपये होते आहे. अपात्र महिलांना दिलेली ही रक्कम परत घेण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनास 450 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
निधी देण्यापूर्वी अर्जांची छाननी झाली असती तर शासनाचे 450 कोटी रुपये गेले नसते. तसेच त्या महिलांना काही महिने निधी मिळाल्यावर आपण अपात्र असल्याचा धक्का बसला नसता. या योजनेत महिलांना 1500 रुपये प्रतिमाह देण्यात आले. पात्रतेच्या अटीत महिलांचे वय 21-65 असावे, कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, कुटुंबात चार चाकी वाहन असू नये तसेच परिवारातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असू नये या अटी होत्या. आता ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही. परंतु त्यांना दिलेली रक्कम परत घेणे उचित नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
महिला आणि बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपात्र ठरवण्यात आलेल्या पाच लाख महिलांपैकी 1.5 लाख महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. तसेच 1.6 लाख महिलांकडे चारचाकी वाहने होते किंवा ‘नमो शेतकरी योजना’ सारख्या इतर सरकारी योजनांच्या त्या लाभार्थी होत्या. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुमारे 2.3 लाख महिला लाभ घेत आहेत. त्यामुळे त्याही या योजनेत अपात्र ठरल्या.