मुंबई | 20 मार्च 2024 : देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद सुरु होत आहे. सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतमधील सुविधा आणि वेग पाहिल्यानंतर बुलेट ट्रेनचे आकर्षण वाढत आहे. बुलेट ट्रेन कधी सुरु होणार आहे? यासंदर्भात चर्चा होत असते. रुळांवरून धावणारी बुलेट ट्रेन पाहण्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. या बुलेट ट्रेनसंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्वाची माहिती दिली दिली आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन 2026 मध्ये रुळांवर धावण्यास सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. भारतातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये तयार होईल आणि मुंबई मार्गावर ती सुरतच्या एका भागावर धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ही बुलेट ट्रेन धावणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनच्या कामाचा कोणता टप्पा सुरु आहे, यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव म्हणाले की, स्थानकांच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली आहे. सागरी बोगद्याचे काम सुरू झाले आहे. या बोगद्यातून गाडी ठाण्याहून मुंबईला पोहोचेल. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील 508 किलोमीटर अंतराचा प्रवास केवळ 2 तासांत होणार आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओमध्ये, 1.08 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या बुलेट ट्रेनसंदर्भात माहिती दिली. बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी 320 किलोमीटर असणे अपेक्षित आहे.बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी 24 पूल आणि सात डोंगरी बोगदे बांधले जात आहेत. कॉरिडॉरमध्ये 7 किमी लांबीचा समुद्राखालील बोगदा देखील असणार आहे.
बुलेट ट्रेनच्या कॉरिडॉरमध्ये स्लॅब ट्रॅक सिस्टीम असेल, हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जपान सरकार मदत करत आहे.मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे ऑपरेशन कंट्रोल सेंटर साबरमती आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या बांधकामावर सातत्याने काम करत आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई येथे स्थानके असतील.