मुंबई : आपण सुंदर दिसावे, असे प्रत्येकाला वाटत असते. मग सौंदर्य निखारण्यासाठी विविध उपाय केले जातात. काही महिला घरगुती उपचार नियमित करतात तर काही महिला पार्लरमध्ये जाऊन विविध थेरीपी करतात. मायानगरी मुंबईतील एका महिलेस पार्लरमध्ये जाऊन फेसियल करणे चांगलेच महागात पडले. यामुळे तिचा चेहराच जळला. तिचा चेहरा कायमस्वरुपी खराब झाला आहे. यामुळे आता त्या पार्लरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पार्लरमध्ये जाण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर या प्रकारबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.
मुंबईतील अंधेरीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक महिला कामधेनू शॉपिंग सेंटरमधील ग्लो लक्स सलूनमध्ये चेहऱ्यावर फेसियल मसाजसाठी गेली होती. त्यासाठी 17,500 रुपयांचे शुल्क भरले. या महिलेने हायड्राफेशियल ट्रिटमेंटची निवड केली. ही मसाज केल्यानंतर महिलेची त्वचा जळू लागली. तिने डॉक्टरांना दाखवले असता मसाजमुळे तिच्या त्वचेचे कायम स्वरुपी नुकसान झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यामुळे त्या महिलेला धक्का बसला. तिने ब्युटी पार्लरविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 17 जून रोजी घडली.
अंधेरीतील ब्यूटी पार्लरमध्ये चेहऱ्यावर मसाज केल्यानंतर महिलेला त्वचेवर जळजळ होऊ लागली. त्यामुळे तिने त्वचा रोग तज्ज्ञाकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्वचेवर होणारी जळजळीवर उपचार केले. तसेच फेसियल ट्रिटमेंटमुळे त्वचेला नुकसान झाल्याचे सांगितले. मसाजसाठी निकृष्ट उत्पादने वापरण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला. या प्रकारानंतर महिलेने सलूनविरोधात एफआयआर दाखल केला.
मनसे नगरसेवक प्रशांत राणे यांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी त्या महिलेला मदत केली. निकृष्ट उत्पादनांचा वापर केल्यामुळे हा प्रकार घडला. या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी कॉमेंट व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘भयानक, माय गॉड! 17,500 रुपये देऊनही महिलेची कातडी जळाली. अनेकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणात केवळ पार्लरवर कारवाई करुन चालणार नाही तर निकृष्ट उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, असे कॉमेंटमध्ये म्हटले आहे.