मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे अनेक हसती-खेळती कुटुंब दु:खात बुडाली. वेगात येणारी नेवीची स्पीड बोट नीलकमल या प्रवासी बोटीला धडकली. नेवीच्या बोटीवर तीन नौसैनिक होते. त्यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला आहे. नीलकमल बोटीवरील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत बोटीवरील 100 पेक्षा जास्त प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले. जे लोक या अपघातातून बचावले, ते कधीच ही घटना विसरणार नाहीत. या अपघातात, ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं, ते प्रचंड दु:खात आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार, या अपघाताने टायटॅनिक जहाज दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.
या बोट दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, “नौदलाच्या स्पीड बोटीचा वेग ताशी 100 किलोमीटर होता. समुद्रात स्पीड बोड गोल-गोल फेऱ्या मारत होती. अचानक वेगात येऊन ही स्पीड बोट आमच्या बोटीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, सगळी बोट हलली. बोटीला छिद्र पडलं व त्यात पाणी जमा होऊ लागलं”
रामने काय सांगितलं?
नीलकमल या प्रवासी बोटीवरील लोक गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला चालले होते. यात बंगळुरुवरुन मित्रांसोबत मुंबई फिरण्यासाठी आलेला राम ही होता. त्याने सांगितलं की, “एलिफंटा गुफा पाहण्यासाठी आम्ही बोटीने चाललो होतो. सोबत तीन मित्र होते. समुद्रात एका टप्प्यावर वेगात आलेली स्पीड बोट आमच्या बोटीला धडकली. त्यांनी लाइफ जॅकेट घातले होते. टक्कर होताच आमच्या नावेत पाणी भरु लागले. बोट तुटली, दोन भाग झाले. काही लोक समुद्रात बुडाले. एक महिला बुडत होती तिला मी वर खेचलं”
मावशीचा शोध लागत नाहीय
उत्तर प्रदेशचा गौतम मुंबईत राहतो. त्याची आई, बहिण आणि मावशी मुंबई फिरण्यासाठी उत्तर प्रदेशातून येथे आले होते. ते नावेमध्ये होते. या दुर्घटनेतून आई आणि बहिण बचावल्याच गौतमने सांगितल. पण मावशीबद्दल माहिती मिळत नाहीय. अनेकांचा आपल्या कुटुंबाशी संपर्क झालेला नाही. वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने संपर्क होत नाहीय.
14 वर्षांचा तरुण फिरण्यासाठी आलेला
14 वर्षांचा तरुण आपल्या नातेवाईकांसोबत फिरण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत आई-वडिल, भाऊ आणि वहिनी होते. तो त्यांचा शोध घेत आहे. आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण अन्य लोकांबद्दल माहिती मिळत नाहीय. प्रशासनाने मदतीला उशिर केला, असं बचावलेल्या लोकांच म्हणण आहे. अलीकडच्या काही वर्षात समुद्रात झालेला हा मोठा अपघात आहे.