मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात काल भीषण अपघात झाला. त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दूर दूरपर्यंत नजर जाईल इतका अथांग सागर पसरलेला असताना स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? हा अपघात कसा घडला? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. एका प्रत्यक्षदर्शीने या अपघाताचा शूट केलेला व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरुन हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. एलिफंटाला चाललेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला स्पीड बोट धडकली. ही स्पीड बोट नौदलाची होती. नौदलाकडून हा अपघात कशामुळे झाला? त्या बद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
नौदलाने सांगितलं की, मुंबई बंदरात स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरु होती. त्यावेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने स्पीड बोटीच नियंत्रण सुटलं व स्पीड बोट नीलकमल बोटीला येऊन धडकली. या अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. त्यात स्पीड बोट नील कमल बोटीपासून काही अंतरावर समुद्रात राऊंड मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीला अजिबात असं वाटणार नाही की, असा काही भीषण अपघात होईल. पण स्पीड बोट टर्न झाल्यानंतर नीलकमल बोटीच्या दिशेने येताना पूर्णपणे अनियंत्रित झाली व नीलकमल बोटीला धडकली.
Speedboat rammed into #ferry
Unverified footage appears to show a speedboat intentionally ramming into the side of the passenger vessel at high speed.#Mumbaiboataccident #mumbai pic.twitter.com/tp8c62WdUZ
— Madhuri Adnal (@madhuriadnal) December 18, 2024
स्टंटमुळे अपघात का?
या अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नीलकमल बोटीवरील 10 प्रवासी आणि तीन नौदलाचे कर्मचारी आहेत. या बोट अपघात प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. नाथाराम चौधरी, श्रवण कुमार, जितू चौधरी हे बुडलेल्या नीलकमल बोटीवर होते. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर या फिर्यादींनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. नेव्हीच्या स्पीड बोटीवरील लोक स्टंट मारत असल्याचे फिर्यादीकडून सांगण्यात आलं.