मुंबई : स्वतःच्या नावे लहानसेच का असेना, एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मायानगरी मुंबईत स्वतःचे घर घ्यायचा विचार करतानाही सर्वसामान्य माणसाची दमछाक होते. मात्र भारतातील एका श्रीमंत व्यावसायिकाने तब्बल 100 कोटी रुपये खर्च करुन मुंबईत दोन फ्लॅट्स खरेदी केल्याची चर्चा रंगली आहे. (Mumbai Businessman Anurag Jain bought Two flats worth Rs 100 Crore)
अनुराग जैन यांनी मुंबईच्या पॉश कार्मायकल रोडवर हे फ्लॅट्स खरेदी केले आहेत. अनुराग जैन हे बजाज कंपनीचे मालक राहुल बजाज यांचे पुतणे आहेत. त्यांची स्वत:ची ऑटो पार्ट्स कंपनी देखील आहे.
अनुराग जैन यांनी दक्षिण मुंबईतील एम एल डहाणूकर मार्गावरील ‘कार्मायकल रेसिडेन्सी’मध्ये दोन फ्लॅट्स खरेदी केल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. या दोन्ही फ्लॅटचे एकूण क्षेत्र 6 हजार 371 चौरस फूट आहे. जैन यांनी 1 लाख 56 हजार 961 रुपये प्रतिचौरस फूट किमतीने हे फ्लॅट्स खरेदी केल्याची माहिती आहे.
जैन यांच्या दोन फ्लॅटची मूळ किंमत 46.43 कोटी होती. पण रजिस्ट्रेशन आणि मुद्रांक शुल्काची भर घालून किंमत दुपटीहून अधिक म्हणजे जवळपास 100 कोटी रुपये झाली, असे म्हटले जाते.
रजिस्ट्रेशनसाठी प्रति चौरस फूट 1.56 लाख रुपये आणि मुद्रांक शुल्क 5 कोटी रुपये भरावे लागल्याची माहिती आहे. हे दोन फ्लॅट खरेदी करताना त्यांना अपार्टमेंटमध्ये 8 पार्किंग जागा मिळाल्या आहेत.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
अनुराग जैन हे ‘एंड्यूरंस टेक्नोलॉजीज’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची कंपनी भारत आणि युरोपमध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे ऑटो-पार्ट्स बनवते आणि पुरवते.
‘कार्मायकल रेसिडेन्सी’ ही 21 मजली इमारत आहे. त्यात फक्त 28 फ्लॅट आहेत. एका मजल्यावर फक्त दोन फ्लॅट बांधले गेले आहेत. जेणेकरुन रहिवाशांना भरपूर मोकळी जागा मिळेल. दोन सदनिकांमध्ये 2000 चौरस फूट जागा आहे. इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहे.
रहिवाशाची इच्छा असल्यास, नंतर ते दोन्ही फ्लॅट एकत्रही करु शकतात. प्रत्येक फ्लॅटच्या एका बाजूला समुद्र, तर दुसर्या बाजूने शहराचे नयनरम्य दृश्य दिसते. या इमारतीत सोलर पॅनेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा आहेत. याशिवाय गच्चीवर एक मोठी बाग आणि इन्फिनिटी पूलही आहे. (Mumbai Businessman Anurag Jain bought Two flats worth Rs 100 Crore)