Mumbai Coastal Road | “मुंबईकरांच स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी बीएमसीच अभिनंदन करतो. 10 किमीचा एक टप्पा झाला आहे. दुसरा टप्पा मे मध्ये पूर्णय होईल. हा कोस्टल रोड दहीसर पर्यंत जाणार आहे. 53 किमीचा हा मार्ग आहे. सध्या दोन तास लागतात. पण आता एकातासापेक्षा कमी वेळ लागेल. प्रदूषण कमी होईल, इंधन वाचेल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोस्टल रोड उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वरळी ते मरीन लाइन्स हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा प्रवासासाठी सुरु होत आहे.
“अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन कोस्टल रोड बनवण्यात आलाय. याला इंजिनिअरींग मार्व्हल आपण म्हणू शकतो” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. “आधीच्या सरकारचा विश्वास नव्हता, म्हणून प्रकल्प पूर्ण व्हायला विलंब लागत होता. इन्स्टाग्रामवर काहीजण फोटो पोस्ट करुन म्हणतात, आम्ही केलं काम. पण किती अडथळे आणले? कसा लेट होईल ते पाहिलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केंद्राकडून पर्यावरणाच्या परवानग्या मिळवल्या. म्हणून हा कोस्टल रोड जलदगतीने पूर्ण होऊ शकला. पण श्रेय द्यायला मनाचा मोठेपणा लागतो. कद्रू मनोवृत्तीचा माणूस हे कधीच करु शकत नाही” अशी टीका शिंदे यांनी नाव न घेता केली.
BMC ने कोस्टल रोड करावा यासाठी हट्ट का?
“हा कोस्टल रोड बनत असताना कोळी बांधवांच्या काही समस्या होत्या. त्यावेळी आम्ही चहल यांना सांगितलं, दोन पैसे जास्त खर्च झाले तरी चालतील, पण कोळी बांधवांना त्रास व्हायला नको. कोळी बांधव दर्याचा राजा आहे, त्याला का नाराज करायच? तो भूमिपूत्र आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “अशी काम आपण MSRDC च्या माध्यमातून करतो. पण हे काम BMC ने करावा यासाठी हट्ट का? यामध्ये मी आता जात नाही” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘अरे ज्या लोकांनी निवडून दिलय, त्यांना तर न्याय द्या’
“कोणी म्हणतं, मी इथून निवडणूक लढवीन, अरे ज्या लोकांनी निवडून दिलय, त्यांना तर न्याय द्या. कोळी बांधवांना न्याय देऊ शकला नाहीत” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर केली. ते वरळीचे आमदार आहेत. याच मतदारसंघात कोस्टल रोड झालाय. मुंबईत 300 एकरमध्ये मुंबई सेंट्रल पार्क होणार आहे, त्याची माहिती सुद्धा शिंदे यांनी दिली. हे सरकार बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईमध्ये आणून दाखवेल असं शिंदे म्हणाले.
सिद्धी विनायक मंदिरासंदर्भात काय घोषणा?
सिद्धी विनायक मंदिर विकासित करण्यासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केलीय. सिद्धी विनायक मंदिराचा डीपीआर सुद्धा चांगला झाला पाहिजे. हे मंदिर सुद्धा अजून उत्कृष्ट सुंदर झालं पाहिजे. सिद्धी विनायक मंदिरासाठी मी चहल यांना उज्जैन महाकाल मंदिराचा जो आर्किटेक होता, त्याला आणायला सांगितलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.