लोकसभेतील यशानंतरही महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण, १६ बड्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना लिहिले पत्र

| Updated on: Jun 25, 2024 | 9:07 AM

Mumbai Congress leaders letter: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 25 जूनला बैठक होणार आहे. आगामी चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. सोमवारी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली.

लोकसभेतील यशानंतरही महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण, १६ बड्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना लिहिले पत्र
congress
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमधील वाद समोर आला आहे. मुंबई काँग्रेसमधील वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहचला आहे. मुंबई काँग्रेसच्या १६ बड्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात हे नेते सक्रीय झाले आहे. त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मागणी केली आहे. या नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्या कामकाजाच्या शैलीवर आपेक्ष नोंदवला आहे. तसेच पक्षात काही संघटनात्मक बदलाची मागणी केली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई काँग्रेसमधील १६ बड्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. यात पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने याप्रकरणी मल्लिकार्जुन खर्गे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, वरिष्ठ नेता केसी वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी यातील अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहे.

कोणी लिहिले पत्र

विधानसभा निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील संघटनेत बदलाची मागणी काँग्रेस नेत्यांनी 16 जून रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे. या नेत्यांमध्ये राज्यसभा सदस्य आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी शहर पक्षप्रमुख जनार्दन चांदूरकर आणि भाई जगताप, ज्येष्ठ नेते नसीम खान, सुरेश शेट्टी, मधु चव्हाण, चरणसिंग सप्रा, झाकीर अहमद आणि महाराष्ट्र काँग्रेसचे कोषाध्यक्ष तसेच अमरजीत मन्हास यांचा समावेश आहे. राष्ट्रीय अध्यक्षांनी लवकरच मुंबई भेटीवर येण्याची मागणीही यावेळी या निवेदनात केली आहे. मुंबईतील काँग्रेस नेत्यांचे हे पत्र चर्चेचा विषय ठरला होता.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 25 जूनला बैठक होणार आहे. आगामी चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. सोमवारी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. त्यानंतर आज मंगळवारी महाराष्ट्रातील नेत्यांची केंद्रीय काँग्रेस नेत्यांसोबत बैठक होत आहे. या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत.