मुंबईत मद्यधुंद तीन तरुणींनी चांगलाच गोंधळ घातला. मद्याच्या नशेत असणाऱ्या या तरुणींनी पोलिसांना शिवीगाळ केली. मारहाण करत त्यांचा ड्रेसही फाडला. विरारच्या पश्चिममध्ये असणाऱ्या गोकुळ टाऊनशिप येथील पंखा फास्ट या बार अँड रेस्टारंटमध्ये हा प्रकार घडला आहे. या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तिन्ही तरुणींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिपमध्ये पंखा फास्ट नावाचा पब आहे. या पबमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली. अर्नाळा सागरी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र मद्यधुंद तीन महिलांनी पोलिसांच्या पथकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिविगाळ आणि मारहाण केली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी उत्कर्षा वंजारी (२५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
काव्या प्रधान हिने (२२) पबमध्ये पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. तिचा गणवेश फाडला. तिचा हाताला चावला घेतला. अश्विनी पाटील (३१) या महिलेने पोलीस कर्मचारी उत्कर्षा वंजारी यांचे केस ओढले. महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर या पबमध्ये त्यांना मदत करण्यासाठी गेल्या असता तिलाही धक्काबुक्की केली. त्यांचा टी-शर्ट फाडण्यात आला. काव्या प्रधानने पोलिस हवालदार मोराळे यांनाही मारहाण केली. तिसरी युवती पूनम हिने पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
विरारमध्ये तीन मद्यधुंद तरुणींचा धिंगान्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात मद्याच्या नशेत गोंधळ घालत शिविगाळ करणाऱ्या तरुणी दिसत आहे. त्यांनी पोलिसांना मारहाण केली आहे.
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी यांनी तिन्ही महिलांना अटक केल्याची माहिती दिली. त्या महिलांना न्यायालयात आणले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची कोठडी दिली.