दिलासा! मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे पहिल्यांदाच ‘शतक’ पार

| Updated on: Oct 21, 2020 | 8:27 PM

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या गृहभेटी सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची तपासणी यामुळे मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे.

दिलासा! मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे पहिल्यांदाच शतक पार
bmc
Follow us on

मुंबई: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या गृहभेटी सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची तपासणी यामुळे मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने अर्धशतक पार केले होते. आता याच श्रृंखलेत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल 102 दिवसांचा टप्पा गाठत ‘शतक’ पार केले आहे. (Mumbai Crossed 100 Cases Of Covid-19 A Day)

महापालिका प्रशासनाने केलेल्या विविध उपाय योजना आणि पोलिसांच्या सहकार्यांने हे उद्दिष्टं गाठण्यात महापालिकेला यश आलं आहे. महापालिकेने हा चांगला पल्ला गाठल्याने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना मोलाची साथ देणाऱ्या मुंबईकरांचे आभार मानत लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर मुंबईत ‘मिशन झिरो’ हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर अधिक प्रभावीपणे अथक प्रयत्न करायचे आहेत, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.

रुग्ण दुपटीचा कालावधी म्हणजे नक्की काय?

‘कोरोना कोविड – 19’ या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते. सध्या मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी हा आता सरासरी 102 दिवस इतका झाला आहे. याचाच अर्थ सांख्यिकीय गणनेनुसार मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्यास सध्या 102 दिवसांचा कालावधी लागतोय. हा आकडा जेवढा अधिक किंवा मोठा असेल, तेवढी ती बाब आपल्यासाठी सकारात्मक असते. ही आकडेवारी एका आठवड्याच्या म्हणजेच 7 दिवसांच्या कालावधीच्या आकडेवारीचे केलेले सांख्यिकीय विश्लेषण असते.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये सकारात्मक वाढ सातत्याने नोंदविली जात आहे. 22 मार्च 2020 रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ 3 दिवस होता. याचाच अर्थ 22 मार्च रोजी रुग्णांची असणारी संख्या तीन दिवसात दुप्पट होत होती. त्यानंतर 15 एप्रिल 2020 रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 5 दिवस एवढा नोंदविण्यात आला. दि. 12 मे 2020 रोजी हाच कालावधी अधिक सकारात्मक होत तो 10 दिवसांवर पोहचला. 2 जून 2020 रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी 20 दिवसांवर; आणि 16 जून रोजी 30 दिवस एवढा नोंदविण्यात आला. 24 जून रोजी 41 दिवस आणि दि. 10 जुलै 2020 रोजी हा कालावधी 50दिवसांवर आणि 25 ऑगस्ट रोजी 93 दिवसांवर पोहचला होता. मात्र, त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी 14 सप्टेंबर रोजी 54 दिवसांपर्यंत नोंदविण्यात आला होता. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी 60 दिवस, 1 ऑक्टोबर रोजी 66 दिवस, 10 ऑक्टोबर रोजी 69 दिवस असा नोंदविण्यात आलेला हा कालावधी आज तब्बल 102 दिवसांवर पोहचला आहे. यामुळे मुंबईतील रुग्णांचा कालावधी दुप्पट होण्याच्या कालावधीने शतकपूर्ती केली आहे. ही बाब सर्वच मुंबईकरांना निश्चितपणे दिलासा देणारी आहे.

रुग्णसंख्येतील दैनंदिन सरासरी टक्केवारीच्या वाढीत सातत्याने घट

महानगरपालिकेच्या सर्वस्तरीय प्रयत्नांना यश येत असल्याचे नुकत्याच उपलब्ध झालेल्या रुग्ण संख्येच्या दैनंदिन आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. यानुसार रुग्ण संख्येत होणा-या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या महिन्यात 21 सप्टेंबर रोजी रोजी 1.22 टक्के असणारी ही आकडेवारी, आता एका महिन्यानंतर ०.69 टक्क्यांवर आली आहे. एकीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीत सकारात्मक वाढ नोंदविली जात असतानाच, रुग्ण वाढीच्या दैनंदिन सरासरी टक्केवारीतही दररोज सकारात्मक घट नोंदविली जात आहे. या दोन्ही बाबी मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहेत.(Mumbai Crossed 100 Cases Of Covid-19 A Day)

‘चेज द वायरस’ आणि ‘ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग’ची चतु:सूत्री

महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘चेज द वायरस’ आणि ‘ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग’ ची चतु:सूत्री या उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करणे, आवश्यकतेनुरुप संशयितांच्या व बाधितांच्या कोरोना विषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार औषधोपचार करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम

`बृहन्मुंबई ‘कोविड 19’ या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रभावीपणे राबविली जात आहे. या अंतर्गत घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणादरम्यान कुटुंबातील सदस्यांची प्राणवायू पातळी व शारीरिक तापमान तपासण्याचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाच्या स्तरावर आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना सहव्याधी (Co-morbidity) असतील, त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे, तर ज्या नागरिकांना कोविडची लक्षणे असतील, त्यांना महापालिकेच्या दवाखान्यात अथवा रुग्णालयात पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी संदर्भित केले जात आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबईतही अवघ्या 15 दिवसात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणार, काम सुरु

BLOG: कोरोनाच्या अफवा आणि गैरसमजांना आळा घालण्यासाठी धडपडणारी तरुणाई

(Mumbai Crossed 100 Cases Of Covid-19 A Day)