मुंबई लोकलचा कणा म्हणजे मोटरमन आणि गार्ड आहे. सोमवारी मोटरमन, गार्ड मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटावर बसून काम करत होते. त्यामुळे काय घडले? याची उत्सुक्ता मुंबईकरांना होती. मुंबईच्या रेल्वे नेटवर्कचे प्रमुख केंद्रसुद्धा सीएसएमटी स्थानक आहे. या ठिकाणावरुन एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेनचे ऑपरेशन्स होते. परंतु त्या ठिकाणी स्वच्छता मानके राखण्यात येत नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना दुर्गंधीमध्ये काम करावे लागते. सोमवारी १८ उंदीर मेल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड वास येऊ लागला. शेवटी फलाटावर बसून कर्मचाऱ्यांनी काम केले.
मुंबई सीएसएमटी स्थानकावर फलाट क्रमांक तीन आणि चारवर लॉबी आहे. उपनगरीय लोकल गाड्यांच्या संचालनावर देखरेख करणाऱ्या मोटरमन आणि ट्रेन व्यवस्थापकांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या ठिकाणी १८ उंदीर मृत झाले होते. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्या ठिकाणी बसून काम करणेही अवघड होते. त्यामुळे शंभरपेक्षा जास्त मोटरमन आणि गार्ड फलाटावर आले. त्यांनी त्या ठिकाणी बसून आपले काम केले. दुपारनंतर प्रशासनाकडून साफसफाईची कामे पूर्ण झाल्यानंतर ते लॉबीमध्ये जाऊन काम करु लागले.
लॉबीमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे. त्यामुळे दुर्गंधी अधिकच येत होते. तसेच प्रत्येकासाठी वेगवेगळ्या कॅबिन आहे. यामुळे या ठिकाणी नियमित स्वच्छता करणे अवघड होत असते. कर्मचाऱ्यांना बसणे अवघड झाल्यानंतर सोफा आणि खुर्च्या टाकून त्या फलाटावर बस्तान बांधले. शेवटी त्या ठिकाणी स्वच्छता केल्यावर १८ मृत उंदीर निघाले.
सीएसटीएम स्थानकावरुन रोज लाखोंच्या संख्येने प्रवाशी प्रवास करतात. त्यात उपनगर आणि एक्स्प्रेस्कमधील प्रवाशी आहेत. त्यांना मोटरमन आणि गार्ड फलाटावर दिसत होते. त्यामुळे नेमके काय झाले? असा प्रश्न त्यांना सातत्याने विचारला जात होता. फलाटावर येणारे अनेक जण प्रश्न करत होते. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात आमचा वेळ गेल्याचे एका मोटरमनने सांगितले. मुंबई सीएसटीएम स्थानकावरील या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरु होती.