मुंबई : मुंबईतील (Mumbai) सर्व दुकाने आणि कार्यालयांवरील पाट्या या मराठीमध्येच असाव्यात. यासाठी पालिका प्रशासनाने 31 मे पर्यंत मुदत दिली होती. दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, आता ही मुदत वाढून देण्यात आली असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही मुदत असणार आहे. आता मुदत संपल्यानंतर दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर त्यावर कारवाई (Action) केली जाणार हे निश्चित आहे. पालिकेचे 75 इन्स्पेक्टर शहरामध्ये पाहणी करून मराठी पाटी नसलेल्या दुकांनांवर कारवाई करणार आहेत. मराठी पाट्या नसलेल्या दुकांनांवर 1 जूनपासूनच कारवाई केली जाणार होती. मात्र, पालिका प्रशासनाकडून (Municipal administration) निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रियेचे काम सुरू असल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडून मिळते आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 ‘क'(1)च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान आणि आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेत नामफलक लावणे आता बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून दुकाने आणि कार्यालयांवर मराठी नामफलक लावण्याची कार्यवाही होत असल्याबाबतची पाहणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी केली जाणार आहे. जर एखाद्या दुकानावर मराठीमध्ये पाटी दिसली नाही तर दंड भरावा लागले. जर एखादा दुकान मालक मराठी पाटी लावणार नसल्याचे म्हटंले तर त्याच्यावर न्यायालयीन खटलाही दाखल केला जाणार आहे.
दुकान मालक इतरही लिपीमध्ये नामफलक लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील पाटी अगोदर असायला हवी. मराठी भाषेतील पाटीवर अक्षरे मोठी असणे देखील आवश्यक आहे. मराठी पाटीवरील अक्षरे इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. या अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषेत पाट्या लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही अटी वेगळ्या ठेवण्यात आला होत्या. आपण नेहमीच बघतो की, अनेक मद्यविक्री केंद्रांना महापुरुष किंवा नामवंत लोकांची नावे दिली जातात. तर अशाप्रकारची नावे देण्यात येऊ नयेत असा देखील निर्णय हा घेण्यात आला आहे.