मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोडून गेले, हाच मोठा गौप्यस्फोट आहे. आता आणखी काय स्फोट करणार आहेत, काय बोलायचं ते बोलू देत, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी बरंच काही बोलू शकतो, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिवसेनेच्या (Shivsena) मागे लागलेलं शुक्लकाष्ट संपू दे, अशी प्रार्थना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पेडणेकर यांच्याही घरी गणेशाचं आगमन झालं. यावेळी त्यांनी टीव्ही 9 कडे प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या काळातच किशोरी पेडणेकर यांना शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलं आहे. मी शिवसेना पक्षावर दाखवलेल्या निष्ठेचच हे फळ आहे, अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ तुमच्या जाण्यानेच मोठा गौप्यस्फोट झाला. यापेक्षा अजून काय स्फोट करणार… भाजपाला जे पाहिजे, ते देण्याची कृपा करू नका. काय बोलायचे ते बोलू देत. मग जनता ठरवेल, स्फोट आहे की आणखी काही आहे…
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर एकनाथ शिंदे यांनी दावा ठोकलाय. त्यातच शिवसेनेच्या काही याचिका घटनापीठासमोर प्रलंबित आहेत. शिवसेनेवर आलेलं हे संकट दूर होण्याची प्रार्थना किशोरी पेडणेकर यांनी गणेशाच्या चरणी केली. त्या म्हणाल्या, ‘ हे जे काही शुक्लकाष्ट शिवसेनेच्या मागे लागलं आहे, त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा. जनतेच्या मनातही धाकधुक, राग, द्वेष आहे, तो संपू देत. दोन वर्षांत सर्व मोकळा श्वास घेत आहेत. आपला सर्वांचा लाडका बाप्पा येत आहे. घरी पाहुणे, मित्रमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी येत आहेत. गणपतीचा साजही करण्यात आलाय. सगळं देणारा हा देव आहे. सर्वांचं भलं, कल्याण कर अशी मी प्रार्थना करते….
शिवसेनेच्या उपनेते पदी निवड झाल्यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ माझी नुकतीच उपनेतेपदी निवड झाली. प्रामाणिकपणे काम केल्याचं फळ आहे. काम करताना निष्ठेने केलं तर फळ मिळतं. सामान्य कुटुंबातील महिलेची असामान्य संघटनेच्या उपनेतेपदी निवड झाली. तुम्ही दाखवलेला हा विश्वास अधिकाधिक दृढ होत जाईल…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपची जवळीक हा सध्या राजकारणातील चर्चेचा विषय आहे. मात्र ईडीच्या भीतीमुळेच राज ठाकरे भाजपसोबत जवळीक साधत आहेत, असा आरोप किसोरी पेडणेकर यांनी केलाय.