मुंबई: मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेश मंडळांना (Ganesh Mandal) दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस ठाण्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र गणेश मंडळांची गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध प्राधिकरणांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केल्यामुळे मंडळांना दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) मंडळांना या वर्षी परवानगीसाठी पालिका 4 जुलैपासून ‘वन विंडो’ सिस्टीम सुरू करणार आहे. 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल व विभागातील पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र पालिकेच्या ‘एक खिडकी’ योजनेच्या (One Window System) माध्यमातून मिळणार आहे.
लाखो गणेशभक्तांना आस लागून राहिलेला गणेशोत्सव 31 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे मूर्तिकार आणि मोठ्या मंडळांकडून नियोजनाची सुरुवातही झाली आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पालिकेच्या परवानगीसाठी प्रशासनाकडून मंडळांना दिलासा देण्यात आला आहे. दरम्यान, कोविड काळामुळे गेली दोन वर्षे माफ करण्यात आलेले 100 रुपयांचे शुल्क या वर्षी भरावे लागणार असून नियम मोडणार नसल्याबाबतचे हमीपत्रही द्यावे लागणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
ज्या गणेशोत्सव मंडळांनी गेल्या वर्षी परवानगी दिली असेल त्या मंडळांनी पालिकेकडे अर्ज पाठवावा. त्या मंडळांना त्वरित परवानगी देण्यात येईल. त्यासाठी गेल्या वर्षी दिलेल्या परवानगीचा क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
या वर्षी मंडळांच्या मूर्तीना सूट मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सवादोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये घरगुती मूर्ती सुमारे दोन फुटांपर्यंत उंचीच्या असतात, तर पालिकेच्या कृत्रिम तलावांत चार ते पाच फुटी गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा असते. मात्र मंडळांच्या मूर्ती दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असतात. त्यामुळे केवळ या वर्षासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला नैसर्गिक जलाशय – तलाव, समुद्रात मूर्तीच्या विसर्जनाची परवानगी राहणार आहे. शिवाय 2023 पासून ‘पीओपी’च्या मूर्तींना बंदी राहणार असल्याचे पालिकेने याआधीच जाहीर केले आहे.