मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई तुंबली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. भांडूप रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यामुळे ठाण्याच्या पुढे लोकल सुरु नाही. कर्जत, कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू आहे. गोरेगाव वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ओबेरॉय मॉलजवळील रस्त्यावर पाणी तुंबले आहे. अनेक वाहने पाण्याखाली अडकली आहेत. अनेक गाड्या पाण्यात बुडल्या आहेत.
मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू आहे. यामुळे डोंबिवली स्थानकात प्रवासांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक चाकरमानी वर्गाने रेल्वे स्थानकावरुन पुन्हा घरचा रस्ता गाठला आहे. मालाड मिठ चौकी लिंक रोड, गोरेगाव लिंक रोड जवळ रस्त्यावर पाणी तुंबले आहे. पाण्यात गेल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. बांगूर नगर लिंक रोडवर मोठे झाड पडल्याने लिंक रोड बंद करण्यात आला आहे.
मुंबईच्या सायन कुर्ला माटुंगा चांदिवली परिसरातील सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे.डोंबिवली शहरात मध्यरात्रीपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. डोंबिवलीत सकाळच्या सुमारासमध्ये रेल्वेची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
भांडुप स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान अप अँड डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन व एक्सप्रेस गाड्या जात नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवशांची व चाकरमान्याची मोठी गर्दी आहे. पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत.
The services have been restored between Kalyan and Kasara with restricted speed. The disruption was primarily because of heavy rains. Inconvenience caused is deeply regretted.
— Central Railway (@Central_Railway) July 7, 2024
पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द केल्या आहेत. प्रगती एक्सप्रेस देखील रद्द केली आहे. मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.