मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर विधानसभेच्या अधिवेशनातही या प्रकरणावरुन वातावरण तापलं होतं. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याप्रकरणी एसआयटी चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. याच प्रकरणी आता मोठी अपडेट आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी केलीय. पठाण यांच्यावतीने वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी केलीय.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली आहे. न्यायालयाने याचिकेचा स्वीकार करीत 6 डिसेंबरला सुनावणी निश्चित केलीय. याचिकेवर सुनावणी निश्चित झाल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणींत नवी भर झालीय.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी कॅव्हेट दाखल केली असून कोर्टाने कोणतेही निर्देश देण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घेण्याची विनंती कॅव्हेटमधून करण्यात आलीय.
दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर होती. तिचा 9 जून 2020 ला संशयितरित्या मृत्यू झाला होता. मुंबईच्या मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन खाली कोसळून तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. पण नंतर तिच्या मृत्यूला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडण्यात आलं होतं.
दोन्ही प्रकरणांमध्ये सुरुवातीला आत्महत्या झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण नंतर दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. पोलिसांना या दोन्ही प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणताही ठोस असा पुरावा मिळालेला नाही.