‘सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही’, हायकोर्टाने जरांगेंच्या वकिलांना खडसावलं

| Updated on: Feb 15, 2024 | 4:37 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. मनोज जरांगे यांना उपचार घेण्यास काय अडचण आहे? असा सवाल हायकोर्टाने केला.

सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही, हायकोर्टाने जरांगेंच्या वकिलांना खडसावलं
Follow us on

मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना उपचार घेण्यास अडचण काय? असा सवाल केला. मनोज जरांगे यांना औषोधोपचार घ्यायला सांगा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या आहेत. फक्त सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. जरांगेंना उपचार घेण्याच्या सूचना कळवा, असे निर्देश हायकोर्टाने जरांगेंच्या वकिलांना दिले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना उपचार घेणं बंधनकारक आहे. मनोज जरांगे मराठा कुणबी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. पण तरीही ते उपचार घेण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे हायकोर्टाने त्यांना उपचार घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कोर्टात काय-काय घडलं?

मनोज जरांगे यांच्या उपचारासाठी 2 डॉक्टर आहेत. जरांगेंना काल दोनवेळा सलाईन लावण्यात आली, असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केला. यावेळी महाधिवक्तांनी मनोज जरांगे डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत, अशी माहिती हायकोर्टात दिली. यावर हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलं. उपोषणस्थळी डॉक्टर असणं, सलाईन घेणं म्हणजे उपचार घेणं असं होत नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं. उपचार घेण्यात जरांगेंना अडचण काय? असा सवालही हायकोर्टाने केला.

वकील गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील यावेळी युक्तिवाद केला. जरांगेंच्या उपोषणाचा परिणाम म्हणून काल अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाली, असं सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात सांगितलं. यानंतर हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले. मनोज जरांगे यांना उपचार घेण्याच्या सूचना कळवा आणि 4 वाजेपर्यंत त्यांचा रिप्लाय द्या, असे निर्देश कोर्टाने दिले.

मनोज जरांगे यांच्याकडून प्रतिसाद नाही

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. ते सकाळपासून झोपलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना उठता-बसताही येत नाहीय. तरीसुद्धा मनोज जरांगे उपचार घेण्यास तयार नाहीत. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि नागरिकांना त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी एक ग्लास पाणी पिलं. मुंबई हायकोर्टाचे निर्देश जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. ते आपल्या जागेवर झोपूनच आहेत.