मुंबई : दिवस-रात्र धावणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं. आता याच धावत्या मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर कामात इतके व्यस्त असतात की, वर्षभरात फार कमी वेळा सुट्टीवर जातात. त्यामुळे मुंबई कधीही थांबत नाही, ती घड्याळाच्या काट्यानुसार चालते. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
एका ट्रॅव्हल वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 51 टक्के लोक कामातून सुट्टीच घेत नाही. कारण त्यांना ऑफिसच्या कामातून वेळ मिळत नसल्याचं कारण समोर आलं आहे. तर 40 टक्के मुंबईकरांना सुट्ट्या मिळत असतानाही ते सुट्ट्या घेत नाहीत. कारण सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना पैसे कमावण्यात अधिक रस आहे. तर 27 टक्के मुंबईकर असे आहेत की, ज्यांनी गेल्या वर्षी (2017) ऑफिसला दांडीच मारलेली नाही.
या वेबसाईटने पुढे दिलेल्या सर्वेक्षणानुसार, 44 टक्के मुंबईकर असे आहेत, ज्यांनी गेल्यावर्षी 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या आहेत. तसेच मुंबईनंतर वर्षभरात 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेणाऱ्यांमध्ये दिल्लीचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी 43 टक्के दिल्लीकर दहापेक्षा कमी दिवस सुट्टीवर गेले होते.
मुंबईत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचे असते. त्यामुळे वारंवार सुट्टया घेतल्याने आपण अपयशी ठरु, अशीही भावना मुंबईकरांच्या मनात असल्याचे या सर्वेक्षणाच्या निरीक्षणात मांडण्यात आली आहे. एकंदरीत मेट्रो सिटी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या आणि कधीही न थांबा केवळ धावत राहणाऱ्या मुंबईत अविरत काम करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही, हेच या ट्रॅव्हल वेबसाईटच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.