मुंबईः उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीचे (Nandkishor Chaturvedi) संबंध काय आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी आताच सांगावं. म्हणजे कोर्ट आणि तपासयंत्रणांचे काम वाचेल, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी स्थापन केलेली कंपनी आज हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीची आहे, हा व्यवहार का झाला, कसा झाला, असे प्रश्न किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी उभे केले आहेत. काल मंगळवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाणे येथील मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे श्रीधर पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत ठाकरे बोलणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील मंत्र्यांविरोधात भाजपने ईडी कारवाईचे सत्र चालवले आहे, असा आरोप वारंवार केला जात आहे. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरच ईडीची धाड पडल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी सर्व डिटेल्स आताच उघड करावेत. त्यामुळे तपास यंत्रणांचे काम वाचेल. 19 बंगले लपवण्याचा खूप प्रयत्न उद्धव साहेबांनी केला. शेवटी खरं बाहेर आलंच. 2019 मध्ये रश्मी ठाकरे म्हणतात बंगले माझे आहेत आणि आज उद्धव ठाकरे म्हणतात तिथे बंगलेच नाहीत. अशाच पद्धतीचा हा किस्सा आहे. श्रीधर पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहारांबाबत उद्धव ठाकरे बोलणार का? ‘ असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे यांनी आपले आर्थिक व्यवहार आताच उघड करावे. कोणत्या शेल कंपन्यांमध्ये त्यांनी पैसे घातले आहेत? मनी लाँड्रिंग केले आहे, यात श्रीधर पाटणकर यांचाही समावेश आहे. त्याची माहिती तुम्ही देणार की तीदेखील किरीट सोमय्यांनाच द्यावी लागणार…. कालचं जे प्रकरण बाहेर आलं, त्यात ईडीने काही कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली असेल. माझे प्रश्न आहेत.
– आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी 2014 मध्ये कोमोस डॉस प्रॉपर्टी ही कंपनी उभारली होती. आदित्य ठाकरे त्यात डायरेक्टर, मालक असून दोघांचे 50-50 टक्के अशी भागीदारी त्यात आहे. या कंपनीची आता काय अवस्था आहे…असा माझा प्रश्न आहे. ही कंपनी आता नंदकिशोर चतुर्वेदीची झाली आहे. हाच नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर आहे. काल त्यांच्यावर 30 कोटींचे आरोप झाले. मग ठाकरे कुटुंबियांनी त्यांची कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीला कशी काय दिली? ही कंपनी तिकडे कशी गेली, असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
इतर बातम्या-