मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडणार असाल आणि लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर येत्या रविवारी 7 एप्रिलला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय सेवेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे. येत्या रविवारी माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.
सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३३ वाजता सुटेल.
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी १०.२७ वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल असून ठाणे येथून दुपारी ०४.०३ वाजता सुटणार आहे.
सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्ग :
ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत सदर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, पायाभूत सुविधांच्या या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.