लोकल सेवा ही मुंबईची जीवन वाहिनी आहे. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. रोजच्या प्रवाशांचा आकडा 70 लाखाच्या पुढे आहे. मुंबईच्या एका टोकावरुन कर्जत-कसारा या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी लोकल सेवा उत्तम पर्याय आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता येतं, म्हणून मुंबईकरांची पहिली पसंती लोकल सेवेला आहे. रस्ते मार्गापेक्षा रेल्वे मार्गाने प्रवास अधिक जलद होतो. पण मुंबईत लोकल प्रवास हा सहज, सोपा नाहीय. लोकल प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. पाऊस, ओव्हर हेड वायरच तुटणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड याचा मोठा फटका लोकल प्रवाशांना सहन करावा लागतो.
मागच्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा वारंवार कोलमडली आहे. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल विलंबाने धावतात. त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो. मागच्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट विलंबाने धावत असल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. लोकलला नियोजित वेळेपक्षा काही मिनिट जरी उशिर झाला, तरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी उसळते. मग, अशा खच्चून भरलेल्या गर्दीतून मुंबईकरांना प्रवास करावा लागतो.
आज मध्य रेल्वे कशामुळे विस्कळीत
आज बुधवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर वरती बांबू पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. माटुंगा स्टेशनच्या जवळ कन्ट्रक्शन साईटचा बांबू ओव्हरहेड वायर वर पडला. अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायी चालत जाणं पसंत केलय. सकाळी ऐन कामावर पोहोचण्याच्यावळी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत.