राज्यात मुंबई, नागपूर अन् पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोमुळे नागरिकांना एक चांगला वाहतुकीचा पर्याय मिळाला आहे. या शहरांमध्ये मेट्रो सेवा लोकप्रिय झाली आहे. मेट्रोकडून लोकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता मुंबईतील मेट्रोने नवीन तिकीट प्रणाली आणली आहे. कागदी तिकीट किंवा ई-तिकीटाला हा पर्याय निर्माण केला आहे. आता फक्त मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) स्कॅन करून मेट्रो १ मधून प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील घाटकोपर, अंधेरी वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी नवीन पर्याय आला आहे. या मेट्रोत प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅनची सुद्धा गरज नाही. त्याऐवजी मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) हा पर्याय आणला आहे. हा पट्टा स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ही सुविधा दिली आहे.
मेट्रोचे कागदी तिकीट खूपच लहान आहे. यामुळे ते हरवून जाते. त्याला पर्याय म्हणून अनेक जण मोबाईल ई तिकीट काढतात. परंतु त्यापेक्षा आणखी एक चांगला पर्याय आणला गेला आहे. ई तिकीट, व्हॉट्सअप तिकिट, पासेस यांना निर्माण केलेला हा चौथा पर्याय आहे. या पर्यायामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची झंझट होणार नाही. तसेच रांगेत उभे न राहावे लागत असल्याने वेळ वाचणार आहे. मनगटावरील बँड २०० रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे.
मेट्रो १ च्या सर्व स्थानकावर हा बँड विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मनगटावरील बँड हा घड्याळाप्रमाणे आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना हा बँड स्कॅन करून आता प्रवास करता येणार आहे. या बँडची किंमत २०० रुपये आहे. तसेच त्यात टॉकअप करण्याची सुविधा असणार आहे. सोयीनुसार हा बँड रिचार्ज करून त्याचा वापर करता येणार आहे.
मुंबईतील मेट्रो स्थानकावर मिळणाऱ्या या बँडसाठी बॅटरीची गरज नाही. तो जलरोधक आणि टिकाऊ आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात तो वापरता येणार आहे. हा पट्टा धुता येणार आहे. तसेच तो स्वच्छही करता येणार आहे. यामुळे त्वचेला कोणती इजा होणार नाही. हा बँड एमएमओपीएलने बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीने तयार केला आहे. त्यामध्ये सिलिकॉनचा वापर करून केला आहे. प्रवाशांच्या पसंतीला हा पर्याय उतरणार आहे, असा विश्वास एमएमओपीएलकडून व्यक्त केला जात आहे.