मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) दिलासादायक ठरणाऱ्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 (Metro) येत्या 15 ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहे. एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे पहिले टप्पे गुढी पाडव्याला सुरु करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं 2015 मध्ये भूमिपूजन करण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्यात मेट्रो 2 अ प्रकल्पातील 9 स्थानक गुढीपाडव्यापासून सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये दहिसर पूर्व,आनंद नगर,कंदार पाडा,मंडपेश्वर,एक्सर,बोरिवली पश्चिम,पहाडी एक्सर,कांदिवली पश्चिम,डहाणूकर वाडी स्थानकांचा समावेश आहे. तर, मेट्रो 7 मधील एकूण 10 स्थानक गुढीपाडव्यापासून सुरु झाली असून त्यामध्ये आरे,दिंडोशी,कुरार,आकुर्ली,पोयसर,मागाठाणे,देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान,ओवरी पाडा,दहिसर पूर्व या स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई मेट्रो 7 चा अंधेरी ईस्ट ते आरे हा टप्पा तर मेट्रो 2 अ वरील डीएन नगर ते डहाणूकरवाडी येथील टप्पा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरु होणार आहे. 2 अ लाईनवरील अंधेरी वेस्ट स्टेशन हे वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मेट्रो लाईनवरील डीएन नगर स्टेशनशी इंटरकनेक्टींग असेल. आगामी काळात मेट्रोच्या दोन्ही लाईन्स सुरु झाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावरील 25 टक्के वाहतूक कमी होईल.
एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चं 75 टक्के काम पूर्ण झालं असल्याचं म्हटलं. या दोन्ही लाईनवरील काम अंतिम टप्प्यात असून लवकरचं पूर्ण होईल, असं श्रीनिवास म्हणाले. मेट्रोच्या कामांचा वेग वाढला असल्याचं देखील श्रीनिवास यांनी सांगितलं आहे.
मेट्रो लाईन | लांबी किलोमीटरमध्ये | कालमर्यादा | काम पूर्ण झाल्याबद्दलची टक्केवारी |
---|---|---|---|
2 अ | 7 | ऑगस्ट 2022 | 80 |
2 ब | 23.6 | जून 2024 | 16 |
3 | 33.5 | अनिश्चित | 75 |
4 | 32.3 | फेब्रुवारी 2024 | 35 |
4 अ | 2.7 | फेब्रुवारी 2024 | 26 |
5 | 24.9 | ऑक्टोबर 2024 | 51 |
6 | 14.5 | फेब्रुवारी 2024 | 48 |
7 | 6.5 | मार्च 2022 | 80 |
9-7अ | 13.5 | ऑक्टोबर 2024 | 24 |
मेट्रो ट्रेन या चालक विरहित तंत्रज्ञान असलेल्या आहेत. आता सुरुवातीला चालकांद्वारे सेवा चालू करण्यात येतील. एका दिवसात 150 फेऱ्या होतील. तीन ते सव्वा तीन लाख प्रवासी दिवसभरात प्रवास करतील, असा अंदाज आहे. मेट्रो 3 चे काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते अडीच वर्षे लागतील, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी दिली.
मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 पहिल्या टप्प्याचे उदघाटन 2 एप्रिलला झालं असून मेट्रो 2 ए मध्ये एकूण 9 स्थानक सुरु झाली आहेत. यामध्ये दहिसर पूर्व,आनंद नगर,कंदार पाडा,मंडपेश्वर,एक्सर,बोरिवली पश्चिम,पहाडी एक्सर,कांदिवली पश्चिम,डहाणूकर वाडी स्थानकांचा समावेश आहे. तर, मेट्रो 7 मधील आरे,दिंडोशी,कुरार,आकुर्ली,पोयसर,मागाठाणे,देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान,ओवरी पाडा,दहिसर पूर्व या स्थानकांवरील सेवा सुरु होईल. सुरुवातीच्या काळात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मेट्रो मार्ग सुरू असतील. एका मेट्रो ट्रेनला सहा कोच असून एका मेट्रोमधून 2280 प्रवासी प्रवास करु शकतात
इतर बातम्या:
Video : ही रोषणाई नाही! कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर भीषण वणवा, पीकांसह फळंही खाक