मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : देशातील एकमेव मोनोरेल ( Mumbai Monorail ) सेवा असलेल्या चेंबूर ते सात रस्ता मोनोरेल मार्गावरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळत बचत होणार आहे. मोनोरेलच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकांत आजपासून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मोनोरेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. आज दि. 2 ऑक्टोबर पासून हा नवा बदल अमलात आला आहे. पाहा नेमका वेळापत्रकात काय बदल करण्यात आला आहे.
मुंबई मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. महात्मा गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून मोनोरेलच्या फेऱ्या आता दर पंधरा मिनिटांनी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जादावेळ मोनोरेलची वाट पहावी लागणार नाही. आधी मोनोरेलच्या फेऱ्या दर अठरा मिनिटांनी होत होत्या. आता त्यात तीन मिनिटांचा अवधी कमी करीत दर 15 मिनिटांनी एक फेरी असे नवेवेळापत्रक 2 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहे.
मोनोरेलला गणपती सणाच्या काळात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. गणपती सणामध्ये मोनोरेलच्या प्रवाशांमध्ये 20 टक्के वाढ झाली होती. याच भागात लालबागचा राजा आणि इतर मोठी गणपती मंडळे असल्याने मोनोरेलला गणपती सणाच्या काळात जादा प्रवासी संख्या लाभली होती. मोनोरेलवर सध्या स्मार्टकार्ड देणे बंद केले आहे. जी पूर्वी दिली तीच स्मार्टकार्ड आतापर्यंत कायम ठेवली असून नव्याने स्मार्टकार्ड देणे बंद केले आहे. मोनोरेलचे प्रशासन एमएमआरडीए सांभाळत असून एमएमआरडीने मोनोरेलची स्माटकार्ड सेवा पुन्हा सुरु करावी अशा मागणी प्रवासी करीत आहेत.
मुंबई मोनोरेलची सुरुवात 2 फेब्रुवारी 2014 साली करण्यात आली होती. परंतू सुरुवातीपासून मोनोरेलला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता मोनोरेलकडे नवीन रेक येणार आहेत. त्यानंतर मोनोरेलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल असे म्हटले जात आहे. प्रवाशांना नवीन स्मार्टकार्ड विकत मिळत नाहीत त्यामुळे प्रवाशांना नेहमी सुट्टे पैसे मोजून तयार ठेवावे लागत आहेत. मोनोरेल प्रशासनाने मेट्रोप्रमाणे क्युआर कोडसह इतर तिकीट विक्रीचे पर्याय सुरु करावेत अशी मागणी प्रवासी करीत आहेत.