मुंबई : सुट्टी असल्याने मालाडमधील मार्वे समुद्र किनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेली पाचही मुलं समुद्रात बुडाली. मुलांना बुडताना पाहून उपस्थित लोकांनी धाव घेत दोघांना वाचवले. मात्र तीन जण बुडाले. बुडालेल्या मुलांचा शोध सुरु आहे. ही सर्व मुलं 12 ते 16 वयोगटातील आहेत. तिघांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. सध्या अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे. सध्या पावसाळ्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडू लागली. मुलांचा पत्ता लागत नसल्याने मार्वे बीचवर बेपत्ता मुलांसाठी हेलिकॉप्टरने शोधमोहीम सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्वे समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. बीचवर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. फायर अँड रेस्क्यू टीम (FRT) शोध मोहिमेचे नेतृत्व करत आहे. बोटी, लाइफ जॅकेट आणि इतर आवश्यक उपकरणांचा वापर करून बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे. शोध आणि बचाव कार्यात मदत म्हणून अनेक एजन्सी सहभागी झाल्या आहेत. या एजन्सींमध्ये BMC चे MFB, पोलीस, तटरक्षक दल, नौदल गोताखोर, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातही खामखेडा खदानीत 10 ते 12 वर्षाची दोन मुलं बुडाली. मात्र गावातील तरुणांना वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ खदानीत उडी घेत मुलांना बाहेर काढले. यानंतर मुलांना तात्काळ मुक्ताईनगर शहरातील डॉ. जगदीश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलांचे प्राण वाचवण्यास यश आले आहे.