लग्न केल्यानंतर किंवा रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतर वाढदिवसापासून लग्नाच्या वाढदिवसापर्यंतच्या सर्व तारखा लक्षात ठेवणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. कारण जर तुम्ही एखादा विशिष्ट दिवस विसरलात तर तुमचा जोडीदार खूप रागावतो. मुंबईतील घाटकोपरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक पतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते! इथे राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेने लग्नाचा वाढदिवस विसरल्यामुळे आपल्या पतीला अशी शिक्षा दिली की हे प्रकरण इंटरनेटवर व्हायरल झालं.
ही घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली असून घाटकोपर पोलिसांनी चार आरोपींची नावे सांगितली आहेत. लग्नाचा वाढदिवस विसरल्यानंतर संतापलेल्या पत्नीने आई-वडील आणि भावाला सासरच्या घरी बोलावले, त्यानंतर त्यांनी पती आणि सासूला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या वाहनाचेही नुकसान केले. घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय डहाके यांनी सांगितले की, चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
2018 मध्ये दोघांनी लग्न केले होते. महिलेचा पती विशाल नांगरे (वय 32) हा कुरिअर कंपनीत ड्रायव्हर आहे. तर पत्नी कल्पना एका फूड आउटलेटवर काम करते आणि दोघेही गोवंडीतील बागणवाडी येथे राहतात. याबाबत बोलण्यासाठी महिला, तिचे आई-वडील आणि भाऊ सासूच्या घरी आल्याचे सांगण्यात आले. रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या भांडणादरम्यान कल्पनाने सासूला थप्पड मारली.
यानंतर हे प्रकरण इतकं वाढलं की दोघांनाही मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर तो व्यक्ती आपल्या आईसह रुग्णालयात गेला आणि वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर घाटकोपर पोलिसांशी संपर्क साधला. पत्नीचा भाऊ आणि आई-वडिलांनी मारहाण केल्याचा दावा त्याने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी नांगरे यांची पत्नी, भाऊ आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात भारतीय दंड विधान कलम 323, 324, 327, 504 आणि 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.