मुंबई आणि उपनगरात लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने सर्व सहा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. या दरम्यान मुंबईत मराठी-गुजराती वाद समोर आला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहे. त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये उबाठामधील शिवसैनिक गेले होते. गुजराती सोसायटीत त्यांच्या प्रचारास विरोध करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केले आहे. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला आहे.
शिवसेना ‘उबाठा’चे शिवसैनिक संजय दिना पाटील यांचा प्रचारासाठी घाटकोपरमध्ये गेले. त्यावेळी मराठी पत्रके वाटण्यास त्यांना विरोध करण्यात आला. मराठी माणसांना बिल्डींगमध्ये प्रचार करु देणार नाही, असे सांगण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. सोसायटीत आम्ही परवानगी घेऊन प्रचार करत आहोत, असे त्यांनी सांगितले, त्यानंतर वाद सुरु होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.
घाटकोपरमध्ये शिवसैनिकांना प्रचार न करु दिल्याबद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले. त्यांनी बुळचट शिवसेना आणि फडणवीस गट गांडू असल्याचे म्हटले आहे. बुळचट शिवसेना आणि फडणवीस हे या विषयावर गप्पा का? हिम्मत असेल तर त्यांनी आवाज द्या नाहीतर आम्ही बघतो काय करायचं आहे ते, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहेत. महायुतीकडून मिहीर कोटेचा उमेदवार आहेत. ठाकरे गटाने उमेदवारी दिलेले संजय पाटील हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. ते २००९ मध्ये ईशान्य मुंबईतून खासदार झाले होते.
ईशान्य मुंबईत संजय पाटील नावाचे चार डमी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोघांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले. याबाबत संजय दिना पाटील यांनी महायुतीवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, खूप मेहनत करुन त्यांनी संजय पाटील नावाचे उमेदवार शोधून आणले. मात्र त्यांचा हा डाव उलटला आहे. सांगलीचे संजय महादेव पाटील आणि नवी मुंबई घनसोलीचे संजय पांडुरंग पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. नवी मुंबईतील संजय निवृत्ती पाटील आणि मुंबई शिवाजी नगरमधील संजय बंडू पाटील यांचे अर्ज स्वीकारले असेल तरी जनतेला सर्व माहीत आहे.