लोकसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वात जास्त धक्का भारतीय जनता पक्षाला बसला आहे. भाजप केवळ 9 जागाच मिळवू शकला आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाड्यात भाजपचा जवळपास पराभव झाला. या सर्वांमध्ये मुंबई उत्तर पश्चिममधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले आहे. महाराष्ट्रात 48 मतदार संघात हा सर्वात कमी फरकाचा विजय आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा लोकसभा मतदार संघातून 4,52,644 लाख मते मिळाली. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना 4,52,596 मते मिळाली. म्हणेज दोघांमधील मतांचे अंतर केवळ 48 राहिले आहे.
मुंबई जोगेश्वरी ईस्टमधील आमदार रवींद्र वायकर यावर्षाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित करण्यात आली. मुंबई उत्तर पश्चिम सारख्या मतदार संघात त्यांना प्रचारासाठी केवळ 13 दिवस मिळाले. मतमोजणी सुरु असताना चित्र वारंवार बदलत होते. कधी अमोल कीर्तिकर पुढे तर कधी रवींद्र वायकर पुढे असे चुरस सुरु होती. एक प्रसंग आला की, जेव्हा कीर्तिकर फक्त एका मताने पुढे होते. परंतु शेवटी अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. आता उद्धव ठाकरे यांनी या निकालात गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा विचार ते करत आहेत.
लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले होते. मग 48 तर भरपूर आहेत. मी देवाला सांगितले होतं की, माझ्याकडून चांगले काम होईल तरच मला जिंकून आणा. आता मला देशासाठी, महाराष्ट्रासाठी अन् मुंबईसाठी काम करायचे आहे, अशी प्रतिक्रिया रवीद्र वायकर यांनी विजयानंतर दिली.