मुंबई : काही राज्यांना भूगोल आहे, तर महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्र हे देशातल इतिहास आणि संस्कृतीने संपन्न असलेलं राज्य आहे. संगीत, लोककलाच नाही, तर महाराष्ट्राला खाद्य संस्कृती सुद्धा लाभली आहे. तळकोकणापासून ते विदर्भापर्यंत काही ठराविक खाद्यपदार्थाची विशेष अशी ओळख आहे. शेगावची कचोरी, अलिबागची पोपटी, विदर्भातल सावजी चिकन आणि मालवणी कोंबडी वडे हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले काही खाद्यपदार्थ आहेत. एखादा व्यक्ती, कुटुंब किंवा ग्रुप सहलीसाठी ठराविक ठिकाणी गेले की, तिथल्या प्रसिद्ध खाद्यपदार्थाचा स्वाद चाखण्याची मजाच काही वेगळी असते.
अलिबागला पिकनिकच्या निमित्ताने गेलं की, तिथे विविध भाज्या टाकून मडक्यामध्ये शिजवली जाणारी पोपटी, शेगावची कचोरी यांचा स्वादच वेगळा. आजही या खाद्यपदार्थांच नाव काढलं की, त्यांची टेस्ट जिभेवर रेंगाळते. अरे, हा पदार्थ इथे मिळाला असता तर किती बर झालं असतं? असं वाटतं. पण हो, आता शेगावची कचोरी, अलिबागची पोपटी, विदर्भातल सावजी चिकन आणि मालवणी कोंबडी वडे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकतात.
‘आता थांबू नका, लगेच या’
वरती सांगितलेले पदार्थच नाही, तर अगदी बिहारच्या चम्पारण चिकनचा स्वादही तुम्ही चाखू शकता. त्यासाठी तुम्हाला खास त्या भागात जाण्याची किंवा पिकनिक काढण्याची गरज नाही. विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानने खवय्यांची खास सोय केली आहे. परळच्या कामगार मैदानात परळ-लालबाग फूड फेस्टिवल सुरु आहे. 28 जानेवारीपर्यंत हा फूड फेस्टिवल चालणार आहे. इथे येऊन तुम्ही शेगावची कचोरी, अलिबागची पोपटी, विदर्भातल सावजी चिकन, मालवणी कोंबडी वडे आणि बिहारच्या चम्पारण चिकनचा स्वाद चाखू शकता. त्यामुळे आता थांबू नका, लगेच या परेलच्या कामगार मैदानात. कारण हातात आता कमी वेळ उरला आहे.