ब्रिजभान जैसवार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : गुजरातच्या जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मौलाना अजहरी यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी घाटकोपर येथून आणखी पाच जणांना उचलले आहे. या पाच जणांना अटक करून घेऊन जात असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे या दगडफेकीत चारपाच पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये एकच तणाव पसरला आहे.
मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक केल्यानंतर घाटकोपर पोलिसंनी आज आणखी पाच जणांना अटक केली. घाटकोपर पश्चिमेतून सलमान सईद, अजीम शेख आणि मोहम्मद शब्बीरलाल मोहम्मद यांना तर विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातून मोहम्मद बिलाल अब्दुल रहमान काझी आणि अब्दुल रहमान अब्दुल्ला काझी यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले चार आरोपी 21 ते 32 वयाचे आहेत. तर एक आरोपी 60 वर्षांचा आहे.
तीन आरोपींना घाटकोपरमधून घेऊन जात असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. एकामागून एक दगडांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात चार ते पाच पोलीस जखमी झाले आहे. आरोपींनीच या पोलिसांवर दगडफेक केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या लोकांनी बेस्टच्या बसेसवरही दगडफेक केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, घाटकोपर प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. गुजरात एटीएसने मुफ्ती मौलानाला घाटकोपर पोलिस ठाण्यात आणले, तेव्हा घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोक जमा झाले होते. मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या कलम 353, 332, 333, 341, 336, 337, 338, 141, 143, 145, 147, 149 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार या जमावाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
31 जानेवारी रोजी गुजरातच्या जुनागढ येथील एका मैदानात कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला अजहरी यांनी संबोधित केलं होतं. या प्रसंगी अजहरी यांनी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केलं होतं. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याप्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला होता. अजहरी यांच्यासह दोन आयोजकांचीही या एफआयआरमध्ये नावे होती. पोलिसांनी या आयोजकांना अटक केल्यानंतर मौलानालाही अटक केली आहे.