मुंबई : मुंबई पोलिसांनी दोन अट्टल चोरांना पकडले आहे. हे दोन्ही चोर अगदी स्पायडरमॅनप्रमाणे अनेक मजले चढून चोरी करत होते. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलीस त्यांच्या शोधात होते. जानेवारी महिन्यात त्यांनी केलेली चोरी त्यांच्यांसाठी अडचणीची ठरली. पोलिसांनी या चोरीच्या अनुषगांने तपास सुरु केला. मग पुरावा मिळताच त्यांना पकडले. दोन्ही चोर सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्यांकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चोरीच्या अनेक घटना
‘स्पायडरमॅन’ चोर झाडाचा आधार घेऊन मोठ्या इमारतीवरील चौथ्या मजल्यापर्यंत सहज चढत होते. बोरवलीमधील एका सोसायटीत हे दोन चोर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढले. तेथून त्यांनी सहा लाख रुपयांची रोकड आणि दागिने लंपास केले होते. झिमद आरमान आणि अली सय्यद अशी त्यांची नावे आहे. त्यांचे वय २३ वर्षे आहे.
पोलिसांनी केली टीम
आरोपींना पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, निरीक्षक विनायक पाटील यांनी पथक तयार केले. या पथकाने दोन्ही चोरट्यांना पकडले. दोघेही झाडाच्या साहाय्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढून चोरी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांची ओळख पटवली. फुटेज स्कॅन केल्यावर पोलिसांना दोघांची माहिती मिळाली. या प्रकरणातील आरोपी अनेक वर्षांपासून चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने अनेक भागात चोऱ्या केल्या आहेत.
अनेक ठिकाणी केल्या चोऱ्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचा जुना गुन्हेगारी इतिहास आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच इतर काही गुन्हेही यामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.