राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 26 आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट) लावला आहे. याप्रकरणी अद्यापही तीन आरोप वाँटेड आहेत. बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी त्यांचेच पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1), 109, 125 आणि 3(5), शस्त्रास्त्र कायद्याचे कलम 3, 5, 25 आणि 27 आणि कलम 37 आणि 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम (एमपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यात संशयित मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा समावेश आहे. तर शुभम लोणकर, जिशान मोहम्मद अख्तर हे आरोपी वाँटेड आहेत. सिद्दिकींची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते.
महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू केला होता. संघटित आणि अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगारी नष्ट करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. दिल्ली सरकारने 2002 मध्ये त्याची अंमलबजावणीही केली. सध्या हा कायदा महाराष्ट्र आणि दिल्लीत लागू आहे. या अंतर्गत अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगार, खंडणी, खंडणीसाठी अपहरण, हत्या किंवा हत्येचा प्रयत्न, धमकावणं यांसह मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्यासाठी करण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांचा समावेश आहे.
मोक्काअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी मिळतो. तर IPC च्या तरतुदीनुसार ही मुदत केवळ 60 ते 90 दिवसांची आहे. मोक्काअंतर्गत आरोपींची पोलिस कोठडी 30 दिवसांपर्यंत असू शकते, तर IPC अंतर्गत जास्तीत जास्त 15 दिवसांची आहे. या कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा मृत्यूदंडाची आहे, तर किमान पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.