आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणवारी बातमी, नितेश राणे देणार पोलिसांना पुरावे, समन्स बजावले

| Updated on: Jul 11, 2024 | 4:10 PM

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना समन्स बजावलं आहे. नितेश राणे या प्रकरणी आता मुंबई पोलिसांना थेट पुरावे देणार आहेत. त्यामुळे आगामी काळात आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणवारी बातमी, नितेश राणे देणार पोलिसांना पुरावे, समन्स बजावले
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना समन्स
Follow us on

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. भाजप नेते नितेश राणे यांना दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलं आहे. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिने सातव्या मजल्यावरुन उडी घेत स्वत:ला संपवलं होतं. पण दिशा सालियन हिचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणे यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनीदेखील दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी नितेश राणे यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे.

नितेश राणे यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर पत्रकारांनी विधान भवन परिसरात त्यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर नितेश राणे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “माझ्या हातात अजून समन्स आला नाही. मी उद्याच या प्रकरणी स्टेटमेंट देण्यासाठी जाणार आहे. आदित्य ठाकरे यांनी 8 जून आणि 13 जूनला कुठे होते? याची सत्यता सांगावी”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

नितेश राणे काय म्हणाले?

“गँगरेप करून दिशा सालियानचा मर्डर करण्यात आला. माझ्याकडे या संदर्भात सर्व पुरावे आहेत. आजही दिशा सालियनचे आरोपी विधान भवनात फिरत आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात मुंबई पोलीस आयुक्तांवर प्रेशर होता. डीसीपींवर प्रेशर होता. आदित्य ठाकरे 8 जून आणि 13 जूनला पार्टीत उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून सर्व काही लपवण्यात आलं आहे”, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय.

“दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आम्हाला यापूर्वी बोलावलं होतं. मी मुबंई पोलिसांना सर्व योग्य ते पुरावे देणार आहे. काही महत्त्वपूर्ण पुरावे आदित्य ठाकरे संदर्भातही मुंबई पोलिसांना मिळाले आहेत”, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. “आता सरकार महायुतीच आहे. आम्ही पुण्याच्या अग्रवालला सोडलं नाही. मिहिर शाहाला सोडलं नाही आणि आदित्य ठाकरे यांनाही सोडणार नाही”, असंदेखील नितेश राणे यावेळी म्हणाले.

‘आदित्य ठाकरेंचं त्या दिवसांचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासा’

“तेव्हाचे सीसीटीव्ही डिलीट करण्यात आले. 8 जूनचे मस्टरचे दोन्ही पानं फाडण्यात आले. आदित्य ठाकरे यांचं 8 जून आणि 13 जूनचं मोबाईल टॉवर लोकेशन काय आहे ते तपासलं पाहिजे. मी अगोदरपासून हे सांगतोय. या दोन्ही ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप आहे. ते पार्टीत तिथे उपस्थित होते. तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. वडील मुख्यमंत्री होते त्यामुळे सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या. पण आता मुंबई पोलिसांना जी माहिती पाहिजे ती सर्व द्यायला मी तयार आहे”, असं नितेश राणे म्हणाले.