मुंबईतील प्रदूषण थांबवा, अन्यथा प्रकल्पच बंद करु, उच्च न्यायालयाने खडसावले

| Updated on: Nov 07, 2023 | 11:57 AM

Mumbai Pollution Update : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालवली आहे. प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई आता दिल्लीच्या मार्गावर जाऊ लागले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. मुंबईतील प्रदूषण थांबवा, अन्यथा प्रकल्पच बंद करु, या शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मनपाला खडसावले आहे.

मुंबईतील प्रदूषण थांबवा, अन्यथा प्रकल्पच बंद करु, उच्च न्यायालयाने खडसावले
Mumbai high court
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निवृत्ती बाबर, मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या चार दिवसांपासून खालवली आहे. मुंबईतली हवेचा स्तर खालवल्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे. चार दिवसांत मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारा, अन्यथा सर्व प्रकल्प बंद करु. नागरिकांच्या जीवापेक्षा विकास कामे महत्वाची नाही? या शब्दांत न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेस खडे बोल सुनावले आहे.

मुंबईत सहा हजार प्रकल्प

मुंबई शहरात सहा हजारापेक्षा जास्त बांधकाम प्रकल्प सुरु आहे. तसेच मुंबई मनपाचे अनेक प्रकल्प सुरु आहे. चार दिवसांत हवेची गुणवत्ता सुधारी नाही तर हे सर्व प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. नागरिकांच्या जीवापेक्षा विकास कामे महत्वाची नाही. सर्व सार्वजनिक प्रकल्पाचे काम रोखू, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे आता राज्यसरकारला ठोस पावले उचलावी लागणार आहे. कारण या आठवड्यात दिवाळीमुळे प्रदूषण वाढण्याचा धोका आहे.

प्रदूषित मुंबईच्या भेटीस येणार केंद्राचे पथक

मुंबईतील हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे साऱ्यांचीच चिंता वाढवली आहे. केंद्र सरकारचे पथक मुंबईतील हवेच्या गुणवत्तेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शहरात दाखल होत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाचे (एमओईएफसीसी) अधिकारी याच आठवड्यात मुंबईत येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या वायू निर्देशांक २०० पेक्षा जास्त

राज्याचा वायू गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर गेला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना रुमाल किंवा तोंडाला मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आली आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्याने श्वसनविकारच्या आजारात वाढ झाली आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य संचालकांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सकांची बैठक घेतली आहे. बैठकीत लहान मुले आणि गरोदर महिलांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.