मुंबई : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक लोड शेडींगमुळे चांगलेच वैतागले आहेत. कडक उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अनेक शहरांमध्ये लोड शेडींग (Load shedding) सुरू आहे, यामुळे जीवाची लाहीलाही होते. अनेक ठिकाणी तर भर दुपारीही लाईट जाते. लाईट सतत जात असल्यामुळे शेतकऱ्यांची देखील तारेवरची कसरत होते आहे. रात्रभर जागून पिकांना पाणी (Water) देण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र, आता थेट परत एकदा मंत्रालयात बत्ती गुल झाल्याचे दिसते आहे. जर मंत्रालयामध्येच बत्ती गुल होत असेल तर राज्याच्या इतर शहरांचा काय विषय असणार.
मंत्रालयामध्ये सकाळच्या वेळी विविध कामांसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामध्येही आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, यामुळे मंत्रालयामध्ये येणाऱ्यांची संख्या जास्त असतानाच आज अचानकच मंत्रालयामधील काही विभागांमध्ये लाईट गेल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठक म्हटंले की, राज्यातील सर्वच मंत्री मंत्रालयामध्ये दाखल होतात आणि बैठकीच्या अगोदरच लाईट गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना देखील काही दिवसांपूर्वी बत्ती गुल झाली होती. यावेळी मात्र, मंत्रीमंडळाची बैठक सुरू होण्याच्या अगोदर लाईट गेली आहे. जवळपास वीस मिनिटांपासून मंत्रालयात वीजप्रवाह खंडित आहे. आता बेस्टचे कर्मचारी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी दाखल झाले आहेत. यासंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली असता काही प्रतिक्रिया न देता एकनाथ शिंदे निघून गेले.