अतुल कांबळे,TV9 मराठी, मुंबई : तुम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर सावधान. कारण गुरुवार 8 डिसेंबरपासून परिवहन विभाग दिवसांचे 24 बाय 7 तास नव्या मोटार वाहन अधिनियम 2019 कायद्यानूसार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा आसूड उगारणार आहे.
वेगाने वाहन चालविण्याच्या घटनांमुळे वाढलेले अपघात पाहून बेफाम चालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सहा महिन्यांकरीता परिहवन विभागाने मोहिम आखली आहे. 1 डीसेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सुरूवातीला चालकांचे प्रबोधन केले गेले. आता 8 डिसेंबरपासून प्रत्यक्षात दंडात्मक कारवाईस सुरूवात होणार आहे.
मुंबई-पुणे नव्या आणि जुन्या अशा दोन्ही महामार्गाच्या टोल नाक्यांवर सुरूवातीचे सात दिवस आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्या पब्लीक अनाऊन्स सिस्टीमद्वारे वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. त्यानंतर आता सात दिवसांच्या प्रबाेधनानंतर कारवाईला प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे.
चुकीच्या पद्धतीने लेन कटींग करणाऱ्यांवर खास लक्ष असणार आहे. तसेच लेनची शिस्त न पाळणाऱ्या अवजड वाहनांना धडा शिकविला जाणार आहे. रस्त्यावर पार्कींग करणे, विशेष म्हणजे उजव्या मार्गिकेत धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यात येणार असून त्यात महामंडळाच्या एसटीलाही कारवाईस सामाेरे जावे लागणार आहे. या प्रकारे नव्या मोटार वाहन कायद्यानूसार 24 बाय 7 कठोर दंडात्मक कारवाई हाेणार आहे.
द्रुतगती महामार्गावर वाहतूकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करण्यात येणार आहेत, टोलनाक्यांवर उद्घोषणेद्वारे जनजागृती केली गेली आहे.
24 बाय 7 अशा प्रकारे नव्या मोटार वाहन कायद्यानूसार दंड आकारला जाणार आहे. नविन कायद्यानूसार विनापरवाना वाहन चालविल्यास 10 हजार रूपये दंड आहे.
अवजड वाहन चालक, विशेषत: ट्रक चालक आपल्या 18 वर्षांखालील मुलांच्या हाती बिनधास्त वाहन देत असतात. अशावेळी 25 हजार दंड आणि तीन महिने जेल जावे लागणार आहे. परदेशात ज्या प्रमाणे पाॅईंट मोजले जातात त्याच प्रमाणे गुण देत पहिला गुन्हा, दुसरा गुन्हा या पद्धतीने गुन्ह्यांचे प्रमाण पाहून कारवाईचे प्रमाण आणि दंडाचे प्रमाण वाढत जाणार आहे.
या उपक्रमासाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची 12 पथकांची निर्मिती केली आहे. या पथकात 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती केले आहेत. यातील सहा पथके आणि 15 अधिकारी या दोन्ही महामार्गावर 24 तास कार्यरत राहणार आहेत.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक वाहतूक विभाग, वाहतूक पाेलीस विभाग, महामार्ग पाेलीस, स्वयंसेवी संस्था यांची देखील माेहिमेसाठी मदत घेण्यात आली आहे.
80 टक्के वाहन अपघात मानवी चुकीमुळे घडतात. चालकांच्या निष्काळजीपणा, बेफीरवृत्ती आणि वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात घडत असतात असे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.