अविनाश माने, मुंबई | दि. 8 मार्च 2024 : रेल्वेमधील नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणात रेल्वेतील बड्या अधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याने २३ पेक्षा जास्त युवकांची फसवणूक केली होती. मध्य रेल्वेच्या मुंबईतील कार्यालयातील मुख्य डेपो साहित्य अधीक्षक (सीडीएमएस) पदावर असलेल्या राजेश नाईक याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. या प्रकरणी सीबीआयने आरोपीशी संबंधित ठिकाणांवर शोधमोहीम राबविली. रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने हा प्रकार केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, राजेश नाईक हा मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेत मुख्य डेपो साहित्य अधीक्षक पदावर कार्यरत होता. त्याने नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना नोकरीचे आमिष दिले. त्यांच्याकडून पैसे घेऊन बनावट नियुक्तीपत्र दिले. मध्य रेल्वेमध्ये विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून २३ पेक्षा जास्त तरुणांची फसवणूक राजेश नाईक याने केली. राजेश नाईक याने डीपीओ, मध्य रेल्वे, मुंबई यांच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, वैद्याकीय तपासणीपत्रे, प्रशिक्षणपत्रे पाठवून मोठ्या प्रमाणात तरुणांकडून पैसे उकळले.
राजेश नाईक याच्या प्रकाराची माहिती सीबीआयला मिळाली आहे. काही जणांना या प्रकाराबाबत सरळ सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने कारवाई केली. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीत म्हटले आहे की, दोन मुलांना मध्य रेल्वेत कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आरोपीने त्यांच्याकडून सुरक्षा ठेव, वैद्याकीय तपासणी शुल्क, प्रशिक्षण शुल्क, अभ्यासक्रम शुल्क अशा विविध शुल्कांच्या नावाखाली एकूण १० लाख ५७ हजार ४०० रुपये उकळले.
तरुणांचा विश्वास बसावा म्हणून बनावट नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षणाचे आदेशपत्र दिले होते. मात्र, मुलांना नोकरी मिळाली नाही. तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. नाईक याला अटक करून घर, कार्यालयाची झडती घेतली. या झडतीमध्ये काय मिळाले, त्याची माहिती मिळाली नाही.