मुंबईतील स्थानकांना इंग्रजांच्या काळापासून असलेली इंग्रजी नावे आता इतिहास होणार आहे. ही नावे जाऊन रेल्वे स्थानकांना मराठमोळे नाव मिळणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. आता यासंदर्भातील ठराव आज सभागृहात येणार आहे. मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील नऊ ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाची नावे बदलली जाणार आहे. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्या बाबत आज सभागृहात काँग्रेसच्या आमदारांकडून लक्षवेधी आणली जाणार आहे. यामुळे आजचा दिवस विधिमंडळ अधिवेशनात महत्वाचा ठरणार आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थितीवर विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह इतर प्रमुख आमदार लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला जाब विचारणार आहे. तसेच राज्यात वाढत असलेल्या हिट अँड रनचा मुद्दासुद्धा आज विधानभवनात उपस्थित होऊ शकतो. रात्रभर झालेल्या मुंबईतील पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. या संदर्भात सुद्धा विधानसभेत आज विरोधक आक्रमक होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे त्याचबरोबर हर्बल रेल्वे स्थानकांच्या नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्रजांच्या काळातील या पाऊलखुणा मिटवण्याकडे एक पाऊल पुढे जाणार आहे.
मुंबईतील व्हेक्टोरिया टर्मिनसचे नाव यापूर्वीच बदलण्यात आले. इंग्रजांच्या काळातील असणारे हे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले होते. तसेच पश्चिम रेल्वेमधील एलफिन्स्टन रोड या स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी स्थानक केले होते. आता उर्वरित नऊ स्थानकाची नावे बदलण्यात येणार आहे.