मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पावसाळ्यात (Rainy season) मुंबईकर जीव मुठीत धरुन असतो. मुंबईत (Mumbai) पावसाचा अंदाज बांधता येत नसल्यामुळे अनेकदा मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडते. समुद्राला आलेली भरती आणि त्याचवेळी मुंबईत कोसळणारा धो-धो पाऊस, सखल भागात साचलेलं पाणी यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेक भागात तर घरातही पाणी शिरतं. अशावेळी आता पावसाळ्यात मुंबईकरांना एका कॉलवर मदत मिळणार आहे. MMRDA खडून पावसाळ्यानिमित्त नियंत्रण कक्षाची (Control Room) स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष 24 तास सुरु असेल.
पावसाळ्यात तुम्ही अडचणीत सापडला असाल तर आता एका कॉलवर तुम्हाला मदत मिळणार आहे. मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांसाठी MMRDA कडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पावसाळ्यात नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाचे नंबरही MMRDA कडून देण्यात आले आहेत.
>> 022- 26591241
>> 022- 26594176
>> 8557402090
>> टोल फ्री – 1800228801
दुसरीकडे पावसाळयात धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात सोडू नये, असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली आहे. त्याद्वारे धरण क्षेत्रातील, परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून 15 जूनपासून लाईव्ह पाहू शकणार आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसंच गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे याचा निश्चित उपयोग होईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.