मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai rain News) एकीकडे पुन्हा एकदा होत असलेली कोरोना रुग्णावाढ नियंत्रणात आहे. असं असताना आता पावसाळी आजारांनी डोक वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. महत्त्वाचं म्हणजे कोरोनानंतर आता मुंबईकर गॅस्ट्रोसह मलेरिया, डेंग्यूच्या तापाने (Dengue Fever) फणफणलेत. तसंच लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे. जुलैमध्ये आतापर्यंत मलेरियाचे 119, गॅस्ट्रोचे 176 तर डेंग्यूचे 19 रुग्ण आढळले आहे. या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी आताच सावधगिरी बाळगण्याची आणि खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. मुंबईत जून महिन्यात अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने जुलैच्या सुरुवातीपासून आपला जोर कायम ठेवलाय. अशात मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याच्या घटनाही समोर आल्या. साचलेल्या पाण्यात किटकांचा प्रादुर्भाव वाढतो आणि दूषित पाण्यामुळे रोगराई पसरते. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन मुंबई पालिकेच्या (BMC 2022) वतीने करण्यात आलं आहे.
मुंबई पावसात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढण्याचे याआधीही पाहण्यात आलं आहे. दरम्यान, यासोबत गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, कावीळ, अशा आजारांचीही मुंबईत दूषित पाण्यामुळे चिंता वाढते. तर किटकांच्या प्रभावामुळे मलेरिया डेंग्यू चिकुनगुनियासारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, शक्यतो साचलेलं पाणी आढळल्यास तातडीनं साफसफाई करावी, असंही आवाहन केलं जातंय. तर स्वच्छता ठेवावी, असं सांगण्यात आलंय.
जुलै महिन्यामध्ये लेप्टोच्या पाच नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे आता लेप्टोच्या रुग्णांची एकूण संख्या 12 वर पोहोचली आहे. सुदैवानं अद्याप लेप्टोमुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर सात जणांना स्वाईन फ्लूचा लागण झाली असल्याचंही निदान झालंय. ज्यांनी ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली आणि ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली अशांनी स्वाईन फ्लूची चाचणी करुन घ्यावी, असा डॉक्टरांकडून दिला जातोय.
#MumbaiRains 13 Jul, 5.45 am.
Mod intensity rainfall likely to continue for next 2,3 hrs over Mumbai, Thane and parts of Raigad and Palghar, as per the latest radar and satellite obs.
Morning wala pl watch. pic.twitter.com/Y49KOrxlUN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 13, 2022
पावसाळी आजारांमुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकाही सज्ज झाली आहे. सध्याच्या घडीला दीड हजार बेडचं नियोजन कऱण्यात आलं. गरज भासली तर बेड्स वाढवण्यात येतील, अशीही माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तसंच घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. कंट्रोल रुमच्या माध्यमातून पालिकेकडून पावसाळी आजारांचा दररोज आढावा घेतला जातो आहे.
मुंबई गेल्या आठवड्यात पावसानं जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर मुंबईत शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे लोकांनाही काळजी घेण्याची आवाहन करण्यात आलं आहे.