मुंबई : मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, मालाड आणि बोरिवलीसह उपनगरातील सर्वच भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काही ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. झाड पडून आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. कांदिवलीत बाथरूमचा स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अंधरेी सबवे प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेच्या दोन्ही बाजूला ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या सबवेतून कुणालाही जाण्यास परवानगी दिली जात नाहीये. रोडवर व्हेरिकेट लावून सध्या अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. बीएमसीचे कर्मचारी पंपिंग मशीनद्वारे अंधेरी सबवेतील पाणी बाहेर काढण्याच्या प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अंधेरीतून प्रवास करत असाल तर सावध राहा. हा महत्त्वाचा मार्ग बंद करण्यात आल्याने तुमची कोंडी होऊ शकते.
कांदिवलीमध्ये बाथरूमचा स्लॅब पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मान्सूनचे आगमन होताच दुर्घटनांना सुरुवात झाली आहे. काल रात्री कांदिवली पूर्वेतील अशोक नगर येथील तेलगू समाज सोसायटीतील बाथरूमचा स्लॅब अचानक खाली पडला. या दुर्घटनेत किसान धुल्ला नावाचा एक 35 वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या आधी 27 जून रोजी रात्री बोरीवली पश्चिम येथील गणपत पाटील नगर येथे घराचा पोटमाळा कोसळून आर्यन पाल नावाच्या दीड महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेत मुलाची मावशी आणि आईही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघेही पोटमाळावरच झोपले होते. मुंबईतील असल्फा मेट्रो स्टेशनजवळ काल रात्री एका घराचा काही भाग कोसळला. घराचा काही भाग पडल्याने त्यात एक व्यक्ती आत अडकली होती. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नसून सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात रात्रभर पाऊस सुरू आहे. आज सकाळीही रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडला. अचानक जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र धावपळ उडाली. रात्रभर काळेकुट्ट आभाळ असल्याने पावसाचा जोर हा कधीही वाढण्याची शक्यता आहे. सतत पावसाची रिमझिम सुरू असतानाही काही सखल भागातील रस्ते वगळता, शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलेले नाही. त्यामुळे नागरिकांनादिलासा मिळाला आहे.
1) वसई:- 63 मिमी
2) जव्हार:- 80.66 मिमी
3) विक्रमगड:- 101.50 मिमी
4) मोखाडा:- 48.20 मिमी
5) वाडा :- 81.75 मिमी
6) डहाणू :- 68.80 मिमी
7) पालघर:- 84.83 मिमी
8) तलासरी :- 31.00 मिमी
एकूण पाऊस :- 559.74 मिमी
एकूण सरासरी :- 69.97 मिमी